प्रसिद्ध ऑस्कर विजेता चित्रपट स्लमडॉग मिलेनियर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. २००९ साली प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक डॅनी बॉयलच्या या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली. ऑस्कर विजेत्या स्लमडॉग मिलेनियर चित्रपटात इरफान खान अनिल कपूर, देव पटेल, फ्रेडा पिंटो आणि सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, स्लमडॉग मिलेनियरसाठी इरफान खान ऐवजी आणखी एका अभिनेत्याचा विचार करण्यात आला होता. दोन भूमिका त्याच्यासमोर ठेवण्यात आल्या होत्या. परंतु त्याने हा चित्रपट नाकारला होता, अशी माहिती खुद्द त्याच अभिनेत्याने दिली आहे. नंतर त्याला आपल्या निर्णयावर पश्चाताप झाला असल्याचेही त्याने सांगितले आहे.
अमित सियाल
इनसाइड एज, महाराणी, मिर्झापूर आणि रेड या चित्रपट आणि वेबसीरीजमधील खास अशा अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अमित सियाल या अभिनेत्याला स्लमडॉग मिलेनियरमध्ये अभिनयासाठी ऑफर आली होती, अशी माहिती त्याने स्वतः दिली आहे. अभिनेता म्हणाला, “स्लमडॉग मिलेनियरसाठी मला विचारण्यात आले होते, एक इरफानची भूमिका होती आणि दुसरी म्हणजे देव पटेलच्या भावाची. परंतु मी इरफानची भूमिका नाकारली आणि दिग्दर्शकांनी दिवंगत अभिनेता इरफान खानला त्यासाठी निवडले.”
अमित सियाल देव पटेलच्या भावाच्या भूमिकेत असल्याचे मानले जात होते
अमित सियाल यांची देव पटेलच्या भावाच्या भूमिकेसाठी निवड पक्की मानली जात होती. त्यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शवली होती. परंतु दिग्दर्शक डॅनी बॉयलला त्या पात्रासाठी अमित अधिक मोठे आणि परिपक्व वाटत होते. ती भूमिका साकारण्यासाठी अमित स्वतः खूप उत्सुक होते त्यामुळे त्यांनी डॅनी यांना सांगितले की, “मी वजन कमी करतो, तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करतो, पण दिग्दर्शक बॉयल यांनी ते मान्य केले नाही. माझी ऑडिशन पाहूनच त्या पात्रासाठी जास्त मोठा वाटत असल्याने आणि कमी परिपक्वता ही पात्राची गरज असल्याने त्यावेळी मला ती भूमिका साकारता आली नाही. मी उत्सुक असल्याने मी खूप पटवून देण्याचा प्रयत्न खूप केला की मी ही भूमिका साकारू शकतो, तेव्हा मला दिग्दर्शकाने सांगितले की तू उत्तम अभिनेता आहेस यात वाद नाही, अभिनयाच्या जोरावर तू एकवेळ ही भूमिका साकारशीलही पण तुझ्या वयानुसार आणि विविध अनुभवानुसार आलेली परिपक्वता तुला अभिनयातून लपवता येणार नाही. अशा तर्हेने भूमिका मधुर मित्तल या अभिनेत्याकडे गेली.” असे अमित सियाल यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे.
इरफानच्या भूमिकेसाठी नकार दिला
दरम्यान, त्या भूमिकेसाठी नकार मिळाल्यानंतर, अमित यांना चित्रपटातील पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करण्यासाठी संपर्क करण्यात आला. मात्र अमित यांनी ही ऑफर नाकारली. “त्या चौकशी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका स्वीकाराल का? असे मला विचारण्यात आले. जी नंतर इरफान खान यांनी साकारली आहे ती. तर मला त्या पात्राचे पटकथेतील महत्व किती आहे?, काय आहे? समजलेच नव्हते. कदाचित त्यावेळी जास्त काही कळतच नव्हते, काय योग्य आहे हे समजण्याची अक्कलच नव्हती. त्यामुळे मला वाटल की फक्त प्रश्न विचारणाऱ्या या पात्रामध्ये काही विशेष नाही. आणि मी त्यासाठी नकार कळवला,” अशी पश्चातापाची भावना या मुलाखतीमध्ये अभिनेते अमित सियाल यांनी व्यक्त केली आहे.