‘गजनी’ फेम अभिनेत्री असिनने मायक्रोमॅक्सचा संस्थापक राहुल शर्माशी लग्न केलं आहे. पण या दोघांचे लग्न एका बॉलीवूड अभिनेत्यामुळे झाले. राहुल हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचा मित्र आहे. त्याच अभिनेत्याबरोबर असिन एका चित्रपटात काम करत होती. त्या अभिनेत्याने ठरवून असिन व राहुल यांची भेट घडवून आणली, पुढे या दोघांनी लग्न केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता एका नवीन मुलाखतीत राहुल शर्माने याबाबत सांगितलं आहे. राहुल व असिनची भेट अक्षय कुमारने घडवून आणली. “आम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी जात होतो. अक्षयचा हाऊसफुल २ हा चित्रपट येणार होता आणि त्या चित्रपटात ती काम करत होती. आणि मग अक्षय म्हणाला, ‘एक चित्रपट येतोय. आम्हाला चित्रपटाचे प्रमोशन करायचे आहे.’ मायक्रोमॅक्स बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या एशिया कपचे स्पॉन्सर होते. जर कोणी मला विचारलं की तू तुझ्या पत्नीला कुठे भेटलास, तर मी म्हणेन पृथ्वीवरील सर्वात रोमँटिक ठिकाण, ढाकामध्ये”असं राहुल हसत राज शामानीच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला.

शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर

अक्षय असिनबद्दल राहुलला काय म्हणाला होता?

पहिल्या भेटीत राहुल व असिन एकमेकांशी जास्त बोलले नव्हते. “अक्षय मला म्हणाला की ती खूप साधी मुलगी आहे. ती अगदी तुझ्यासारखीच आहे. ती येते, तिचे काम करते आणि परत जाते. खूप प्रोफेशनल आहे. तिची आई डॉक्टर आहे, वडील नोकरी करतात. मग त्याने तिचा नंबर मला आणि माझा नंबर तिला दिला. आमच्यात खूप साम्य आहे असं त्याला वाटलं. आम्ही सारख्याच कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलो आहोत,” असं राहुल शर्मा म्हणाला.

अक्षयने असिनशी करून दिलेली ओळख आणि भेट हे त्याचं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं योगदान असल्याचं राहुल म्हणतो. राहुल शर्माशी लग्न केल्यावर असिनने अभिनय सोडला. असिन शेवटची २०१५ मध्ये रोमँटिक कॉमेडी ‘ऑल इज वेल’ चित्रपटात झळकली होती.

हेही वाचा – रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?

२०१६ मध्ये, अक्षयने स्वतः असिन आणि राहुल यांचं लग्न जमवल्याचं म्हटलं होतं. “मी हे साडेतीन ते चार वर्षांपासून लपवून ठवतोय. पण होय, मीच त्यांना भेटायला लावलं. जॅकलीन फर्नांडीजचा यात सहभाग होता, पण तिलादेखील माहीत नव्हतं, कारण मी खूप हुशारीने या सगळ्या गोष्टी केल्या,” असं अक्षय म्हणाला होता. अक्षयने सांगितलेलं की ‘हाऊसफुल 2’ च्या शूटिंगदरम्यान टीम दिल्लीत होती. तिथे सगळे लपंडाव खेळत होते. राहुल शर्मादेखील तिथे आला होता. “मी त्या दोघांना एकाच कपाटात लपायला सांगितलं. तिथून सुरुवात झाली आणि आता ते दोघे लग्न करत आहेत,” असं अक्षय म्हणाला होता.

असिन व राहुल शर्मा यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. त्यांना सात वर्षांची अरीन नावाची मुलगी आहे. असिन सोशल मीडियावर तिच्या मुलीचे फोटो शेअर करत असते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This bollywood actor played matchmaker for asin husband rahul sharma hrc