Sourav Ganguly biopic: भारताचा माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार आणि ज्याला प्रिन्स ऑफ कोलकाता म्हटले जाते, अशा सौरव गांगुलीचाही आता बायोपिक येत आहे. याबद्दल खुद्द सौरव गांगुलीने दुजोरा दिला आहे. याआधी अनेक क्रिकेटपटूंचे बायोपिक आलेले आहेत. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतने महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये काम केले होते. हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला. त्यानंतर इतर क्रिकेटपटू आणि खेळाडूंचेही बायोपिक येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालमधील बर्धमान शहरात गुरूवारी सौरव गांगुलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने बायोपिक येत असल्याबाबत माहिती दिली. तसेच या चित्रपटात बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव हा त्याची भूमिका वठविणार असल्याचे गांगुलीने सांगितले. पण तारखांचा घोळ असल्यामुळे बायोपिक प्रदर्शित करण्यात वर्षभराहून अधिक काळ लागू शकतो, असेही गांगुलीने सांगितले.

सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चांगले यश मिळवले होते. बायोपिकमध्ये गांगुलीचे वैयक्तिक आयुष्य आणि मैदानातील त्याचे नेतृत्व याबाबत चित्रण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर राजकुमार राव हा बॉलिवूडमधील चतुरस्र आणि प्रयोगशील अभिनेता मानला जातो. अनेक चित्रपटातून त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवून दिलेले आहे. त्यामुळे तो सौरव गांगुली कसा साकारतो, याबद्दल चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल.

राजकुमार राव (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

दरम्यान बायोपिकवरील काम प्राथमिक स्तरावर असल्याची माहिती इंडिया टुडेने दिली आहे. चित्रपटाबाबतची अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान राजकुमार राव त्याच्या आगामी भूल चुक माफ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. त्याच्याबरोबर वामिका गब्बी या चित्रटात दिसणार आहे. याशिवाय राजकुमारचा मलिक हा चित्रपट अखेरच्या टप्प्यात असून २० जून २०२५ रोजी तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सौरव गांगुलीची कारकिर्द

सौरव गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व फॉरमॅटमध्ये एकूण १८,५७५ धावा केल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषविलेले आहे.

सौरव गांगुलीच्या वाहनाचा अपघात

दरम्यान बर्धमान येथे गुरुवारी रात्रीचा कार्यक्रम आटोपून जात असताना सौरव गांगुलीच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हुगळी येथे सदर अपघात झाल्याचे कळत आहे. सौरव गांगुलीला कोणतीही दुखापत झाली नसून वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.