बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत आहे. या चित्रपटानंतर विकी कौशल लवकरच ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. यासाठी विकी खास तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे.
छत्रपती शंभूराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करणार आहेत. चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून यासाठी अभिनेत्याची कोणतीही लुक टेस्ट घेण्यात आलेली नाही. याबाबत पीटीआयला प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, “मला खात्री आहे की, विकी या भुमिकेसाठी अगदी योग्य आहे. त्यामुळे त्याची टेस्ट घेण्यात आलेली नाही.” मराठ्यांच्या साम्राज्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरु होणार आहे.
सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची संपूर्ण टीम ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, परंतु दिग्दर्शकांनी काही गोष्टींवर काम करण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. सिनेमातील प्री-प्रोडक्शनचे काम सुरु असून शूटिंगचे वातावरण, सेट, वेशभूषा, कलाकार याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच छत्रपती शंभूराजांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता विकी कौशल अतिशय उत्सुक असून यासाठी तो भाषाकौशल्य, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे विशेष प्रशिक्षण घेणार आहे. चित्रपटात महाराणी येसूबाईंची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना साकारणार असल्याची चर्चा आहे परंतु याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, जरा हटके जरा बचके या चित्रपटानंतर विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. ‘सॅम बहादूर’ मध्ये विकीबरोबर सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसतील.