गुरु दत्त, परवीन बाबी, दिव्या भारतीपासून ते सुशांत सिंह राजपूतपर्यंत कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजचा मृत्यू हा मनाला चटका लावून जाणारा होता. आज अशाच एका ७० च्या दशकातील यशस्वी अभिनेत्रीविषयी आपण जाणून घेणार आहोत जीचीन कारकीर्द फारशी मोठी नव्हती. तिने एकच सुपरहीट चित्रपट दिला, त्यानंतर ती एका दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अन् एके दिवशी अचानक तिचा खून झाल्याची बातमी समोर आली.
ती अभिनेत्री म्हणजे ‘हीर रांझा’, ‘हंसते जख्म’सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारी प्रिया राजवंश. प्रियाचं मूळ नाव वीरा सुंदर सिंह होतं. हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेली प्रिया ही नंतर लंडनमध्ये कला क्षेत्रात शिक्षण घेत असतानाच तिचा एक फोटो सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते ठाकूर रणवीर सिंह यांच्या नजरेत आला. १९६२ मध्ये रणवीर सिंह यांनी प्रियाची गाठ देव आनंद व विजय आनंद यांचे बंधू चेतन आनंद यांच्याशी घालून दिली.
आणखी वाचा : कपूर घराण्यातील पहिले पदवीधर सदस्य; शम्मी कपूर यांचे सुपुत्र झाले ६७ व्या वर्षी ग्रॅजुएट
१९६४ साली चेतन आनंद यांच्या ‘हकीकत’मध्ये प्रियाला अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर यांच्यातील जवळीक वाढत गेली अन् प्रियाने नंतर चेतन आनंद यांच्या चित्रपटातच काम करण्याचा निर्णय घेतला. १९७० मध्ये आलेला ‘हीर रांझा’मध्ये प्रियाने राज कुमारसह काम केलं, हा चित्रपट तिच्या कारकीर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. प्रिया आणि चेतन आनंद ही एकत्रच रहात होते, १९९७ मध्ये जेव्हा चेतन आनंद यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांबरोबरच प्रिया राजवंशचाही संपत्तीवर समान हक्क असल्याचं त्यांनी लिहिलं होतं.
२००० साली प्रिया राजवंश हिचा चेतन आनंद यांच्या घरी खून झाल्याचं समोर आलं आणि चेतन यांची मुलं केतन व विवेक आनंद यांना या खुनाच्या आरोपाखाली अटक करून जन्मठेपेची शिक्षाही सुनावली. २००२ मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली खरी पण नंतर या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली, अद्याप हे प्रकरण कोर्टात असून यावर सुनावणी व्हायची बाकी आहे.