गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. ‘आदिपुरुष’नंतर आता दिग्दर्शक नितेश तिवारी आता करत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर ‘केजीएफ’स्टार यश हा ‘रावण’ म्हणून दिसणार आहे.
या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे, इतकंच नव्हे तर तो यासाठी मांसाहार व मद्यपानही बंद करणार असल्याची चर्चा आहे. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवा अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्टसुद्धा दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला अन् तिच्या ऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार हे स्पष्ट झालं. परंतु आता साई पल्लवी ऐवजी दुसरीच अभनेत्री ही भूमिका साकारणार अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
चित्रपटाचे निर्माते या भूमिकेसाठी साई पल्लवी किंवा जान्हवी कपूर या दोघींपैकी एकीचं नाव नक्की करणार होते अन् यासाठी जान्हवीलाही विचारणा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता मात्र यावर पडदा पडला आहे. जान्हवी कपूरला या चित्रपटाबद्दल कधीच विचारणा झालेली नव्हती त्यामुळेच आता जान्हवीचा पत्ता कट झाला असून ही भूमिका साई पल्लवीच साकारणार आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रीपोर्टनुसार, “या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत, इंडस्ट्रीत या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल खूप अफवा पसरवल्या जात आहेत. ‘रामायण’मधील सीतेच्या भूमिकेसाठी जान्हवी कपूरला कधीच विचारणा झालेली नव्हती. या भूमिकेसाठी आलिया किंवा साई पल्लवी यांच्यापैकीच एकीची निवड होणार होती.” अशी माहिती काही सूत्रांनी दिलेली आहे.
मीडिया रीपोर्टनुसार रणबीर कपूर व यश या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. तर यात हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहे या गोष्टीचीही पुष्टी झालेली आहे. अद्याप चित्रपटाचं प्री-प्रोडक्शन काम सुरू असून मार्च मध्ये याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट २०२५ च्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा अंदाज निर्मात्यांनी वर्तवला आहे.