‘गरिबांचा अमिताभ बच्चन’ म्हणून ज्यांच्या चित्रपटांना बऱ्याचदा हिणवलं गेलं त्या मिथुन चक्रवर्ती यांचे भारतातच नाही तर परदेशातही खूप चाहते आहेत. बॉलिवूडमधला ८० ते ९० हा काळ मिथुन यांनी चांगलाच गाजवला आहे. त्यांच्या त्या काळातील चित्रपटांची लोक आज खिल्ली उडवतात, पण त्याच चित्रपटांमुळे मिथुन चक्रवर्ती टिकून आहेत. मिथुन चित्रपटसृष्टीत टिकू शकले ते केवळ त्यांच्या मेहनतीच्या जोरावर.
आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाचं यश हे त्याच्या कमाईवर ठरतं. आजकालचे सगळेच चित्रपट सहज १०० कोटींची कमाई करताना आपल्याला दिसतात, परंतु सर्वात पहिला १०० कोटींचा चित्रपट मिथुन चक्रवर्ती यांनी दिला होता हे फारसं कुणाला ठाऊक नसेल. १९८२ साली आलेला मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने तेव्हा १०० कोटींचा व्यवसाय केला होता. याबद्दल नुकतंच मिथुन यांनी भाष्य केलं आहे.
बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना मिथुन म्हणाले, “आजकाल चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली नाही तर तो फ्लॉप म्हणून गणला जातो. त्यावेळी जेव्हा ‘डिस्को डान्सर’ने १०० कोटींचा व्यवसाय केला तेव्हा मला यावर विश्वासच बसत नव्हता. बापरे एवढे पैसे कसे कमावले? अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती.” पुढे मिथुन यांनी त्यांच्या काळातील चित्रपट हीट आणि फ्लॉप कसे ठरायचे याबद्दलही भाष्य केलं आहे.
मिथुन म्हणाले, “आमच्या काळात चित्रपटाने ठरलेल्या टेरिटरीमध्ये ३ ते ५ कोटींचा व्यवसाय केला म्हणजे टॉ ब्लॉकबस्टर मानला जायचा. अशा वेगवेगळ्या टेरिटरीजचा व्यवसाय ५० ते ५५ कोटींचा जवळपास जाणारा असेल तर ती फारच मोठी गोष्ट होती. याउलट आजचा एखादा चित्रपट १०० कोटींचा व्यवसाय करत नसेल तर ती आश्चर्याची बाब वाटते.”
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्याकाळात ‘डिस्को डान्सर’ची १२ कोटींच्या आसपास तिकिटे विकली गेली होती. १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. केवळ भारतातच नव्हे तर बाहेरील देशांतही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आशिया, युरोप, रशिया, चीन, टर्की, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका या देशांतही ‘डिस्को डान्सर’ने उत्तम व्यवसाय केला. आजही हा चित्रपट आणि यातील सुपरहीट गाण्यांची आठवण प्रेक्षक काढतात. या चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.