सलमान खानच्या बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाटत पाहत आहेत. या चित्रपटाबाबत आज भाईजानने महत्त्वाची अपडेट दिली आहे. इतकंच नाही तर या चित्रपटातील पहिलं लूक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. यामध्ये सलमानबरोबरच कतरिना कैफचाही फर्स्ट लूक पाहायला मिळत आहे.
सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ‘टायगर ३’ चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. सलमान खानने ट्वीटमध्ये लिहीलं, “येतोय! ‘टायगर ३’ दिवाळी २०२३ ला. टायगर ३ YRF50 सह तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर सेलिब्रेट करा. हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये चित्रपट रिलीज होत आहे.”
या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना दोघेही हातात बंदूक घेऊन दिसत आहेत. हे पोस्टर पाहून ‘टायगर ३’ ‘टायगर’च्या पहिल्या दोन्ही भागांपेक्षा मोठा आणि भव्य असेल असं दिसतंय. दरम्यान, ‘टायगर ३’ हा लोकप्रिय ‘YRF स्पाय युनिव्हर्स’चा पाचवा चित्रपट आहे. सलमान आणि कतरिना सहा वर्षांनंतर पुन्हा टायगर आणि झोया म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
२०१२ मध्ये आलेला ‘एक था टायगर’ या फ्रेंचाइजीचा पहिला चित्रपट होता. त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. यात सलमान रॉ एजंट टायगर तर कतरिना आयएसआय एजंट झोयाच्या भूमिकेत होती. नंतर २०१७ मध्ये ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा दुसरा भाग आला होता. यानेही चांगली कमाई केली होती.