रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टायगर ३’ पाहताना माधुरी दीक्षितने काम केलेल्या एका जाहिरातीची हटकून आठवण येते. साबणाची जाहिरात ना… करायचे काय आहे त्यात… एक हुशार आई असते माझ्यासारखी, एक मुलगा… त्याचे दोन्ही हात मळलेले आणि एक डॉक्टर… आणा हॅण्डवॉश म्हटल्यानंतर तिच्या हातात एक सॅशे टेकवला जातो आणि हेच हॅण्डवॉश आहे म्हणत स्वस्त किमतीत पुरवठ्याचा हॅण्डवॉश म्हणत तो किती वेगळा आहे याची मल्लिनाथी केली जाते. ‘टायगर ३’ पाहताना अशीच काहीशी भावना होते. अतिशय कर्तव्यदक्ष, देशाभिमानी गुप्तहेर, त्याला देशद्रोही कारवायांमध्ये अडकवायचे, मग तो अचाट पराक्रम दाखवून देशाला संभाव्य संकटातून वाचवतो आणि त्याची देशभक्ती (दूर कुठल्या तरी परदेशात राहून) सिद्ध करतो. सलमान आणि कतरिना जोडीचा ‘टायगर ३’ म्हणजे शिळ्या कढीला उगाच थोडी वेगळ्या वाटणाऱ्या कथेची फोडणी देऊन हेच खमंग असे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन यशस्वी चित्रपटांनंतर खरं तर तिसऱ्या चित्रपटाच्या बाबतीत टायगर हा एकमेव आकर्षण नव्हे. तर यशराज फिल्म्सने जो आपल्या गुप्तहेर शृंखलापटांचा बोलबाला केला आहे. त्यात कुठे तरी टायगर आणि पठान एकत्र येतील, कदाचित ‘वॉर’चा कबीरही त्यांना येऊन मिळेल याची उत्सुकता अधिक आहे. तसे पाहायला गेले तर पठाण आणि टायगरची छोटेखानी एकत्र येऊन केलेली मारामारी हा चित्रपटातील रंजक भाग नक्कीच आहे, पण इथेही फार मजा येत नाही. त्याचे कारण मुळात शाहरुख खानच्या चित्रपटात नुसती हाणामारी नसते, त्याच्या मिश्कील स्वभावाचा पुरेपूर वापर ‘पठाण’च्या व्यक्तिरेखेसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे ‘पठाण’मध्ये जितके हसतखेळत पडद्यावर गुंडांना चोप देण्याचे काम सुरू असते तितक्या खेळकरपणे ‘टायगर ३’मध्ये ते काम होत नाही. टायगरची व्यक्तिरेखा मुळातच थोडी गंभीर आहे. विनोद त्याच्या प्रकृतीला फारसा मानवत नाही, त्याउलट भावनिक नाट्य ही सलमानच्या चित्रपटाची ताकद आहे. त्यामुळे ‘टायगर ३’साठी कथेची मांडणी करताना एक अतिरंजक सूडनाट्याचा आधार घेण्यात आला आहे. त्यासाठी सलमानच्या नेहमीच्या यशस्वी फॉर्म्युल्यांपैकी एक भाईजानने थेट पाकिस्तानात उतरणे याचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> टायगर ३’ ची दमदार कमाई! तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, एकूण कलेक्शन तब्बल…

‘टायगर’ चित्रपट शृंखलेतील पहिल्याच चित्रपटानुसार टायगर हा पाकिस्तानचा जावई आहे. टायगर अजूनही रॉसाठी काम करत असला तरी झोयाने पाकिस्तानसाठी काम करणे सोडून दिले आहे. आयएसआयची गुप्तहेर असलेली झोया घरसंसारात रमलेली आहे. या दोघांचे एकमेकांवरचे घट्ट प्रेम आणि त्यांचा मुलगा हे छोटे सुखी कुटुंब मोडून कोणाला तरी टायगरला उचकवायचे असेल तर त्यासाठी गतशत्रू उकरून काढावे लागतात. इथे झोयाच्या भूतकाळात घडलेल्या घटना आणि त्या संदर्भाने टायगरने ओढवून घेतलेले शत्रुत्व असे काहीसे कथानक चित्रपटात आहे. चित्रपटातील वेगळेपणा जो काही आहे तो या कथासूत्रापुरताच आहे. बाकी आधीच्या चित्रपटातील राकेश (कुमुद मिश्रा), करण (अनंत शर्मा), झोयाचे भूतपूर्व सहकारी कॅप्टन अब्रार- कॅप्टन बेग ही जोडगोळी, टायगरचा सहकारी गोपी (रणवीर शौरी) ही जुनी मंडळी इथे नव्याने भेटतात. कथेच्या अनुषंगाने नव्या कलाकारांचा भरणा अधिक आहे. या चित्रपटात रॉचे प्रमुख शेणॉय (गिरीश कर्नाड) यांची जागा मैथिली मेनन (रेवती) यांनी घेतली आहे. त्यांच्या भूमिकेची लांबी फारशी नाही, तरीही रेवती यांचे अस्तित्व सुखावणारे आहे. मुख्य शत्रू आतिश रेहमानच्या भूमिकेला अभिनेता इम्रान हाश्मीने चांगला न्याय दिला आहे. त्याच्या दिसण्यापासून असण्यापर्यंत त्याने घेतलेली मेहनत जाणवते. सलमान खान हाणामारी करताना अधिक बरा वाटतो, बाकी त्याला फार भावनिक व्हायला वेळ मिळत नाही आणि कतरिनाचे लग्न झालेले असल्याने की काय टायगर-झोया जोडी प्रेम करताना कमी अॅक्शन रूपात अधिक दिसते. अॅक्शनच्या बाबतीत कतरिना दमदार आहे हे तिने आधीही सिद्ध केले आहे. इथेही ते जाणवते. याशिवाय, आमिर बशीरसारखी अनुभवी कलाकार मंडळींमुळे चित्रपट अभिनयाच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाही. मात्र कथामांडणी आणि दिग्दर्शन दोन्ही बाबतीत चित्रपट सरधोपट झाला आहे.

मनीष शर्मा यांनी पहिल्यांदाच अॅक्शनपटाला हात घातला आहे. याआधी त्यांनी ‘बॅण्ड बाजा बरात’पासून ‘सुई धागा’पर्यंत अनेक चांगले, यशस्वी कौटुंबिक चित्रपट दिले आहेत. ‘टायगर ३’च्या बाबतीत कथाकल्पना आदित्य चोप्रा, पटकथा लेखन श्रीधर राघवन आणि दिग्दर्शन मनीष शर्मा अशी तीन डोकी एकत्र आली आहेत. ‘पठान’ आणि ‘वॉर’च्या बाबतीत ही कथेवर आणि दिग्दर्शनावर सिद्धार्थ आनंदची पकड होती. इथे ही दिग्दर्शकीय पकड सैल आहे. त्यातल्या त्यात अॅक्शनपट असल्याने चित्रपट कुठेच गाण्यात अडकवलेला नाही. आणि प्रेक्षकहो, गाणे कितीही कंटाळवाणे असले तरी ते संपेपर्यंत खुर्ची सोडू नका. न जाणो दोन तासांत मनोरंजन झाले नसेल तर शेवटचे काही सेकंद तुमची कळी खुलेल..

 दिग्दर्शक – मनीष शर्मा

● कलाकार – सलमान खान, कतरिना कैफ, इम्रान हाश्मी, कुमुद मिश्रा, रेवती.