अभिनेते जॅकी श्रॉफ हे गेले अनेक वर्ष त्यांच्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. पण त्यांच्यावर एक वेळ अशी आली होती की श्रॉफ कुटुंब कर्जबाजारी झालं होतं. त्यांच्यावर घर गहाण ठेऊन जमिनीवर झोपण्याची वेळ आली होती. पण काही वर्षांनी त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ याने त्यांचं तेच गेलेलं घर परत मिळावल, असा खुलासा जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी केला.
जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ यानेही त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आज त्याचं नाव बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांच्या यादीत सामील आहे. नुकतीच जॅकी श्रॉफ यांनी टायगरबरोबर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली. या भागात जॅकी यांच्या पत्नी आयेशा श्रॉफही काही वेळासाठी सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवसांच्या आठवणी सांगितल्या. त्या कठीण दिवसांबद्दल बोलताना तिघेही भावूक झाले.
आणखी वाचा : ‘कौन है वो…’ अजय देवगणच्या बहुचर्चित ‘भोला’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
‘बूम’ या चित्रपटानंतर जॅकी श्रॉफ आणि त्यांचं कुटुंब कर्जबाजारी झाले होते. आयेशा श्रॉफ यांची निर्मिती असलेल्या ‘बूम’ हा प्रदर्शनाआधिच व्हायरल झाला आणि त्यामुळे त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. भावूक होत त्या म्हणाल्या, “त्यावेळी जॅकी श्रॉफ यांनी कर्ज फेडायचं ठरवलं. त्यासाठी आम्हाला आमचं घरही गहाण ठेवावं लागलं. पण जेव्हा टायगरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा तो मला म्हणाला की मी आपलं गेलेलं घर तुम्हाला मिळवून देईन आणि त्याने त्याचा शब्द खरा केला. टायगरने काही वर्षांनी आम्ही गमावलेलं घर विकत घेतलं “
हेही वाचा : Video: चित्रीकरणादरम्यान अभिनेता टायगर श्रॉफला गांभीर दुखापत, व्हिडीओ पाहून नेटकरी काळजीत
याआधी एका मुलाखतीत टायगर म्हणाला होता, “मला आठवतंय की आमच्या घरातील एकेक वस्तू विकली जात होती. माझ्या आईने केलेली पेंटिंग्स, लॅम्प्स.. लाहानपणीपासून मी ज्या गोष्टी बघत आलो त्या सगळ्या माझ्या डोळ्यादेखत नाहीशा होत होत्या. एक वेळ अशी आली की आम्हाला आमचा बेडही विकावा लागला. आमच्यावर जमिनीवर झोपण्याची वेळ आली. तो आमच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. तेव्हा मलाही काम करायची इच्छा होती पण मी कुटुंबाला मदत करण्यासाठी काहीही करू शकत नव्हतो.”