दिग्दर्शक व अभिनेता तिग्मांशू धुलियाच्या चित्रपटांचे अनेक चाहते आहेत. तिग्मांशूच्या कामाइतकीच त्याची लव्ह स्टोरी भन्नाट आहे. त्याला शेजारी राहण्याऱ्या मुलीवर प्रेम झालं, दोघांचं अफेअर होतं, पण जेव्हा ती मुलगी घरून पळून आली, तेव्हा तिग्मांशूने लग्न करण्यास नकार दिला होता. त्यानंतर काय घडलं हे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात.
तिग्मांशु धुलिया हा मूळचा उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील आहे. त्याचे वडील केसी धुलिया हे कानपूर जिल्हा न्यायालयात वकिली करायचे. तर, तिग्मांशुची आई सुमित्रा धुलिया अलाहाबाद विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापक होत्या. वडिलांच्या मृत्यूनंतर तिग्मांशू आपल्या आईसोबत अशोक नगर, अलाहाबादमध्ये सरकारी घरात राहत होता.
तिग्मांशूचे शिक्षण अलाहाबादच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. तो हायस्कूलच्या परीक्षेत नापास झाला होता, तर त्याचे सर्व मित्र पुढच्या वर्गात पोहोचले होते. मित्रांसमोर लाज वाटू नये म्हणून तिग्मांशू हायस्कूलच्या शिक्षणासाठी डेहराडूनला गेला. डेहराडूनमधून हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा अलाहाबादला आला. त्याने अलाहाबादच्या अँग्लो-बंगाली इंटर कॉलेजमधून इंटरमीडिएट केले.
तिग्मांशुच्या शेजारी एक अधिकारी राहायचे, त्यांच्या मुलीचे नाव तुलिका होते. तिग्मांशू नववीत असताना त्याचं आणि तुलिकाचं अफेअर सुरू होतं. १९८६ मध्ये तिग्मांशु दिल्लीला गेला त्याचदरम्यान तुलिकाच्या वडिलांचीही नोएडाला बदली झाली होती आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न एका इंजिनिअरशी ठरवले होते. अशातच तुलिका घरातून पळून गेली आणि तिग्मांशुकडे पोहोचली. त्यावेळी तिग्मांशु त्याचा मित्र अभिनेता संजय मिश्राबरोबर राहत होता. तुलिकाशी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायला तो अजिबात तयार नव्हता.
संजय, तुलिका आणि त्यांच्या सर्व मित्रांनी समजावून सांगितल्यावरच तो लग्नासाठी तयार झाला. यानंतर दोघांनी दिल्लीच्या आर्य समाज मंदिरात लग्न केले. सुमारे नऊ वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न केले होते. लग्न केल्यानंतर ते दिल्ली सोडून पळून गेले होते, कारण तुलिकाचे कुटुंबीय व पोलीस त्यांचा शोध घेत होते.