हास्यप्रधान भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते टिकू तलसानिया यांना शुक्रवारी (११ जानेवारी २०२५) ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची मुलगी आणि अभिनेत्री शिखा तलसानिया हिने वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती देत चाहत्यांचे आणि शुभेच्छुकांचे आभार मानले आहेत.
रविवारी शिखाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून तिच्या वडिलांच्या प्रकृतीसंबंधी अधिकृत माहिती शेअर केली. टिकू तलसानिया यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिखाने प्रथमच यावर भाष्य केले आहे.
शिखाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, “तुमच्या सर्व प्रार्थना आणि काळजीबद्दल धन्यवाद. आमच्यासाठी हा भावनिक काळ होता, पण आम्हाला सांगायला आनंद होत आहे की वडील आता बरे होत आहेत आणि चांगल्या प्रकारे सावरत आहेत,”
तिने तिच्या वडिलांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांना आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले. शिखाने पुढे लिहिले, “कोकिळाबेन अंबानी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जे उपचार काही केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच, चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही अत्यंत ऋणी आहोत.”
‘दिल है की मानता नही’ (१९९१), ‘कभी हां कभी ना’ (१९९३) आणि ‘इश्क’ (१९९७) यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या टिकू तलसानिया यांना शुक्रवारी ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर मुंबईतील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान काही माध्यमांमध्ये सुरुवातीला त्यांना हार्ट अटॅक आला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या टिकू तलसानिया यांच्या पत्नी यांनी या सर्व बातम्यांचे खंडन करत त्यांना ब्रेन स्टॉक झाल्याचे सांगितले होते. ७० वर्षीय टिकू एका सिनेमाच्या स्क्रीनिंगला गेले होते, तिथे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.