‘खल्लास गर्ल’ अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि रेस्टॉरेट व्यावसायिक टिमी नारंग यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खूप दिवसांपासून होत आहे. पण ईशाचा पती टिमीने टिमीने याबाबत मौन सोडलं आहे. आपला घटस्फोट झाला आहे, अशी अधिकृत माहिती टिमीने दिली आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा घटस्फोट मंजूर झाला, असा टिमी नारंगने खुलासा केला आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, या दोघांचा १४ वर्षांचा संसार मोडला आहे. ईशा तिची नऊ वर्षांची मुलगी रियानासह पतीच्या घरातून निघून गेली आहे. टिमीने सांगितलं की ते जवळजवळ दीड वर्षापासून घटस्फोटाचा विचार करत होते. अखेर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला.
“आम्ही दोघेही आता आपापल्या आयुष्यात पुढे जाण्यास मोकळे आहोत, ही वस्तुस्थिती आहे,” असं टिमी म्हणाला. दरम्यान, ईशाच्या घटस्फोटाची चर्चा मागील काही दिवसापासून होत होती. आता तिचा पती टिमीनेच कायदेशीररित्या घटस्फोट झाल्याची माहिती दिली आहे. घटस्फोट आधीच झाला असल्याने कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून माहिती देत असल्याचं टिमीने सांगितलं. अजूनही इन्स्टाग्रामवर ईशाचे पूर्ण नाव ईशा कोप्पीकर नारंग असे दिसत आहे, त्यामुळे घटस्फोटाबाबत संभ्रम होता, तो टिमीने दूर केला आहे.
२००९ मध्ये एका जिममध्ये भेटल्यानंतर त्यांनी एकमेकांसह डेटिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगी आहे. ईशाच्या इन्स्टाग्रामवर तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबरचे काही फोटो पाहायला मिळतात. दरम्यान, ईशा लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आहे. शाहरुख खानचा ‘डॉन’, विवेक ओबेरॉय स्टारर ‘क्या कूल है हम’ आणि ‘कयामत’ यांसारख्या हिंदी चित्रपटातील भूमिकांसाठी ईशा ओळखली जाते.