Tishaa Kumar Passes Away: चित्रपट निर्माते आणि संगीत निर्माते दिवंगत गुलशन कुमार यांचे भाऊ, टी-सीरिजचे माजी अभिनेते आणि चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांच्या मुलीचे तिशाचे वयाच्या एकविसाव्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घकाळ ती कर्करोगाबरोबर लढा देत होती. काल १८ जुलैला उपचारादरम्यान तिचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिशा कुमारवर जर्मनीमध्ये उपचार सुरू होते. कुमार कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने तिच्या निधनाची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिशाला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर कुमार कुटुंबाने तिला उपचारासाठी जर्मनीमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. तिथेच तिचे काल १८ जुलैला गुरुवारी निधन झाले आहे. कुटुंबासाठी अत्यंत दु:खद आणि कठीण काळ असल्याचे म्हणत टी-सीरिजने एक निवेदन जारी केले आहे.

कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारचे निधन झाले आहे. दीर्घकाळ कर्करोगाबरोबर लढा दिल्यानंतर तिचा काल मृत्यू झाला असून कुटुंबासाठी अत्यंत कठीण काळ आहे. या काळात कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर करावा ही विनंती आहे, असे प्रवक्त्याने म्हटले आहे. तिशा आपल्या वडिलांबरोबर टी-सीरिजने आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना दिसायची. ती शेवटची रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट यशस्वी झाल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीमध्ये दिसली होती.

दरम्यान, कृष्ण कुमार हे १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेवफा सनम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जातात. या चित्रपटातील गाणी आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आजा मेरी जान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘कसम तेरी कसम’ आणि ‘शबनम’ या चित्रपटांतदेखील ते अभिनय करताना दिसले होते. याबरोबरच ते भारतातील सर्वात मोठ्या संगीत निर्मिती कंपनीचे मालक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला असून कृष्ण कुमार यांचे वडील चंद्रभान हे भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतात स्थलांतरित झाले होते, ते फळ विक्रेता होते.

हेही वाचा: दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर बेतलेली भूमिका करण्याविषयी महेश भट्ट यांनी दिला होता इशारा; इमरान हाश्मीने सांगितली ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ चित्रपटाची आठवण

दिवगंत निर्माता आणि टी-सीरिज कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांचीदेखील लोकप्रियता मोठी होती. सुपर कॅसेट इंडस्ट्रीजचे ते संस्थापक होते. संगीत निर्मितीसाठी त्यांना ओळखले जायचे. कृष्ण कुमार यांनी अजित सिंग यांची मुलगी आणि अभिनेत्री नताशा सिंगची बहीण अभिनेत्री तान्या सिंगसोबत लग्न केले आहे. त्यांच्या मुलीचे तिशाचे कर्करोगाने अकाली निधन झाल्याने कुमार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tishaa kumar passes away 21 year old daughter of formar actor and producer krishnan kumar nsp