बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि सुपरस्टार शाहरुख खान यांच्या ९० च्या दशकातील प्रत्येक चित्रपटाला आणि दोघांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. १९९५ मध्ये रिलीज झालेल्या काजोल-शाहरुखच्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील ‘जाती हूं मैं’ गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने या गाण्याबद्दल आणि शाहरुख खानविषयी खुलासा केला आहे.
‘करण अर्जुन’ चित्रपटातील ‘जाती हूं मैं’ गाणे राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केले असून कुमार सानू आणि अल्का याज्ञिक यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी चिन्नी प्रकाश यांनी केली होती. याविषयी सांगताना काजोल म्हणाली, हे गाणे एवढे लोकप्रिय कसे झाले याबाबत मला खरंच कल्पना नाही. मला या गाण्याबाबत काहीच माहिती नव्हते. कोरिओग्राफर, दिग्दर्शकांनी जे करायला सांगितले तसे मी केले. एक गोष्ट आवर्जून सांगेन की, या गाण्याच्या संपूर्ण शूटिंग दरम्यान मला शाहरुखने खूप समजून घेतले. शाहरुख खूप चांगला सहकलाकार आहे कारण, त्याला माहिती असते एक महिला कसा विचार कसेल? तिला काही त्रास होत नाही ना? याची तो पूर्ण काळजी घेतो.
हेही वाचा : “सेटवरचा एक दिवा विझला अन्…”, मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा
शाहरुख खानबरोबर काम करण्याच्या अनुभवाबाबत काजोल म्हणाली, मी माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले आहे परंतु, या सगळ्यांमध्ये शाहरुख सर्वात जास्त समजूतदार आहे.
दरम्यान, अभिनेत्री काजोल लवकरच ‘द ट्रायल’ वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ‘द ट्रायल’ सीरिजचे ८ भाग १४ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहेत.