सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांच्या चर्चा आहेत. एकीकडे अनेक चित्रपटांची चित्रीकरणं सुरू आहेत, तर दुसरीकडे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आता या सगळ्यामध्ये जान्हवी कपूरचा ‘मिली’ चित्रपट जबरदस्त चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता आज या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून तिचे चाहते या चित्रपटासाठी फार उत्सुक झालेले दिसत आहेत.
आणखी वाचा : ‘हॅरी पॉटर’ फेम रॉबी कॉलट्रेन यांना आधीच लागली मृत्यूची चाहूल? म्हणाले होते, “पुढील ५० वर्षांनी मी नसेन पण…”
सत्य घटनेवर आधारित ‘मिली’ चित्रपटात जान्हवी कपूर ‘मिली नौटियाल’ या विद्यार्थीची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरची सुरुवातीला ‘मिली’ प्रेक्षकांना तिची औपाचारिक ओळख करून देते. तसेच ती तिच्या वडिलांचीही ओळख करून देते. या ट्रेलरमधून वडील मुलीच्या प्रेमळ नात्याची झलक पाहायला मिळते. स्वावलंबी होण्यासाठी ती एका फूड सेंटरमध्ये काम करायला सुरुवात करते. एक दिवस ती या फूड सेंटरच्या फ्रीझिंग रूममध्ये अडकते आणि या ट्रेलरमधील थरार सुरु होतो.
या खोलीत उणे १६ तापमान असते. ती या खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण तिला ते सहज शक्य होत नाही. जीवघेण्या थंडीपासून वाचण्यासाठी ती स्वत:भोवती प्लॅस्टिक आणि टेप गुंडाळते. तर बाहेर सगळेजण तिला शोधण्याचे अथक प्रयत्न करतात. यातून ती कशी बाहेर पडते किंवा त्या खोलीत तिला कोणकोणत्या समस्यांना समोरे जावे लागते हे या चित्रपटातून उलगडणार आहे.
हेही वाचा : अभिनेत्री सारा अली खान दिसणार देशभक्तीपर चित्रपटात, साकारणार ‘ही’ भूमिका
या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केलेली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी पहिल्यांदाच तिच्या वडिलांची निर्मिती असलेल्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले असून या चितरपटाचे संगीत ए. आर. रहमान यांचे आहे. पुढील महिन्यात ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.