निर्माती एकता कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘लव्ह, सेक्स और धोखा’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चित्रपटाचा टीझर आधीच प्रदर्शित झाला आहे. याच्या टीझरमध्ये ‘कुलू’ नावाचं तृतीयपंथी पात्र महत्त्वाचं असल्याचं दिसत आहे. हे पात्र टान्सवूमन बोनिता राजपुरोहित साकारणार आहे.
बालाजी मोशन पिक्चर्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात बोनिता तिची दुःखी कहाणी सांगत आहे. बोनिता म्हणते की ती राजस्थानमधील डुंगरी या छोट्या गावातून आली आहे.”मी स्वतःबद्दल चित्रपटांमधून शिकले. जेव्हा जेव्हा मी माझ्यासारख्या व्यक्तीला चित्रपटांमध्ये पाहायचे तेव्हा मला वाटायचं की ती माझ्यासारखीच आहे. माझ्यासारख्या महिलांना पडद्यावर पाहणं ही माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मी अभिनय करेन, बॉलीवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारेन, पण काही स्वप्न खरंच पूर्ण होतात,” असं ती म्हणाली.
एकेकाळी बोनिता एका प्रॉडक्शन कंपनीत काम करायची. तिथं तिला महिन्याला १० ते १५ हजार रुपये मिळायचे, जे जगण्यासाठी पुरेसे नव्हते. या चित्रपटात काम करण्यासाठी दिबाकर बॅनर्जींनी अभिनयाचे धडे दिले, असं तिने सांगितलं. तर बोनिताने चित्रपटात उत्तम काम केलंय, असं बॅनर्जी म्हणाले.
या चित्रपटात मला स्वतःचीच भूमिका करायची आहे, ज्या समस्या मला येतात त्याबद्दलच मला यात बोलायचं आहे, असं बोनिता म्हणाली. या चित्रपटात अनु मलिक, तुषार कपूर, सोफी चौधरी, मौनी रॉय आणि इतर काही कलाकार पाहुण्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट १९ एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.