बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सोनम आता पुन्हा एकदा इंडस्ट्रीत पुनरागमन करू इच्छित आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. सोनम राय आणि सोनम खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘त्रिदेव’ या सुपरहिट चित्रपटात काम केलं होतं. तिची ओळख आजही त्याच चित्रपटामुळे आहे. अवघ्या १९ व्या वर्षी इंडस्ट्री सोडणारी सोनम हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिने ओटीटी, महिलांवर सुंदर दिसण्याचा दबाव आणि कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडेल याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं.
सोनम म्हणाली, “माझ्या मनाला भिडेल अशा कामाच्या शोधात मी आहे. नकारात्मक भूमिका असो किंवा सकारात्मक, मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. मला पडद्यावर माझ्याच वयाची भूमिका करायची आहे. मी कोणत्याही प्रकारचे बोटॉक्स केलेले नाही किंवा मी कोणतेही फिलर वापरलेले नाही. मी ५१ वर्षांची आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वाला आणि संवेदनशीलतेला साजेशी अशीच व्यक्तिरेखा मी साकारेन. मला अशी भूमिका हवी आहे, ज्याशिवाय कथा पुढे जाऊ शकणार नाही.”
‘आजतक’शी बोलताना सोनमने आताच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सबद्दल तिचं मत मांडलं. “सध्या ओटीटीनं सिनेमाचा फिक्स टाईप मोडला आहे. ओटीटी जबरदस्त आहे, कलाकारांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मी फक्त ओटीटीमुळे इंडस्ट्रीत परत येण्याचा निर्णय घेतला आहे. मला हे व्यासपीठ एक्सप्लोर करायचे आहे. मी सर्व प्रकारच्या प्रयोगांसाठी तयार आहे. मी बिकिनी मॉम बनण्यासही तयार आहे. जर मी त्यावेळी सेक्सी सोनम होते तर आजही मी सेक्सी सोनम बनू शकते. मला सेक्सी म्हटलं गेलं पण मला कधीच वाईट वाटलं नाही. मी कधीही तो शब्द ‘अपशब्द’ म्हणून स्वीकारला नाही. जर मला कोणी सेक्सी आईची भूमिका ऑफर केली तर मला आनंद होईल. कदाचित मी पुन्हा बिकिनी घालून लोकांना आश्चर्याचा धक्का देईन. ५० वर्षांच्या स्त्रिया बिकिनी घालू शकत नाहीत असं कोण म्हटलं? हा स्टिरिओटाइप मोडायलाही मी तयार आहे,” असं सोनम म्हणाली.
या क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रींवर सुंदर दिसण्याचा दबाव असतो. त्यावरही सोनमने भाष्य केलं. “हो, खूप दडपण असते. विशिष्ट प्रकारे दिसण्याचा किंवा स्वतःला सादर करण्याचा सतत दबाव असतो. हे सगळं करायचं नसेल तर इथून निघून जाणं हाच पर्याय उरतो. मात्र, केवळ चित्रपटसृष्टीलाच का लक्ष्य केले जाते? जगभरातील महिला या दबावातून जातात. त्यांच्यावर सर्व प्रकारची बंधने किंवा लोकांच्या नजरा असतात. आज, जर तुम्ही एखाद्या पुरुषाला सुदृढ शरीरयष्टीच्या मुलीशी लग्न करण्यास सांगितलं तर तो दोनदा विचार करतो. हा दबाव सर्वत्र आहे. महिलांना सर्वत्र हा भेदभाव सहन करावा लागत आहे. आम्हा महिलांना नेहमीच या भेदभावाचा सामना करावा लागला आहे. आपण जिमला जातो, आपल्या वजनावर सतत लक्ष ठेवतो, आपल्याला तरुण दिसायचे आहे, इतका दबाव का आहे?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.