रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. काही सेलिब्रिटीजनी चित्रपटावर टीका केली आहे तर काही लोकांनी चित्रपटाचं आणि रणबीर कपूरचं कौतुक केलं आहे. रणबीर, बॉबी अन् रश्मिका यांच्याबरोबरच आणखी एका अभिनेत्रीचं प्रचंड कौतुक होत आहे ते म्हणजे तृप्ती डिमरीचं.

आणखी वाचा : ‘शोले’मधील ‘त्या’ सुपरहीट सीनची क्लिप शेअर करत राम गोपाल वर्मा यांची ‘अ‍ॅनिमल’च्या टीकाकारांची उडवली खिल्ली

चित्रपटात अगदी छोटी पण अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या तृप्तीला या चित्रपटामुळे चांगलाच फायदा झाला आहे, तिच्या चाहत्यांच्या संख्येत तर वाढ झालीच आहे पण याबरोबरच ती आता ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखली जात आहे. नुकतंच तृप्तीने याबद्दल भाष्य केलं आहे. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधतांना तृप्ती म्हणाली, “पहिल्या दिवशी माझ्या भूमिकेबद्दल फारसं कुणी काहीच बोललं नाही, त्यामुळे मी मनाची तयारी केली होती की असं होतं कारण मी माझ्याकडून पूर्णपणे मेहनत त्या भूमिकेसाठी घेतली होती अन् प्रेक्षकांनाही चित्रपट आवडत होता, परंतु हळूहळू वातावरण बदलत गेलं अन् सर्वत्र माझ्याच भूमिकेची चर्चा होऊ लागली जी अद्याप थांबलेली नाही.”

पुढे तृप्ती म्हणाली, “हे खरंच फार सुंदर आहे. चाहत्यांच्या संख्येत फॉलोअर्समध्ये होणारी वाढ, त्यांच्याकडून मिळणारं प्रेम ही तर तुमच्या कामाची पावती आहेच. परंतु मला या गुरफटून राहायचं नाहीये. सध्या मला नॅशनल क्रश वगैरे म्हंटलं जातंय हेदेखील मला ठाऊक आहे, ही फार वेगळीच अन् जबरदस्त भावना आहे.” चित्रपटात तृप्तीची भूमिका एका इन्फॉर्मरची आहे अन् या भूमिकेवरुन, तिच्या आणि रणबीरच्या पात्राच्या केमिस्ट्रीवरुन अन् एकूणच चित्रपटात स्त्री पात्राला सादर करण्याचा पद्धतीवरुन चांगलंच वादळ उठलेलं दिसत आहे.

यावरही तृप्तीने भाष्य केलं आहे, शिवाय रणबीरच्या बूट चाटण्याच्या सीनवरुनही चांगलाच वाद निर्माण झाला आहे, या सगळ्या विषयांवर तृप्तीने प्रथमच भाष्य केलं आहे. तृप्ती म्हणाली, “माझ्या अभिनय प्रशिक्षकांनी सांगितलेली एक गोष्ट मी कायम लक्षात ठेवली ती म्हणजे माझ्या पात्राचं कधीच परीक्षण केलं नाही. मी साकारत असलेलं पात्र, माझा सहकलाकार साकारत असलेलं पात्र ही शेवटी माणसंच आहेत अन् माणसांना चांगल्या व वाईट अशा दोन्ही बाजू असतात. या सगळ्यापलीकडे जाऊन काम करायला कलाकाराने शिकायला हवं. जर एखाद्या पात्राची कृती, त्याचे विचार यांचं तुम्ही परीक्षण करायला गेलात तर ते पात्र तितक्याच सचोटीने तुम्ही साकारू शकणार नाहीत अन् हीच गोष्ट मी कायम ध्यानात ठेवली.”

पुढे त्या बूट चाटण्याच्या सीनबद्दल तृप्ती म्हणाली, “अशी एखादी स्त्री जी त्या व्यक्तिरेखेसमोर त्याचे वडील, पत्नी, मुलं सारं कुटुंबाला मारायची भाषा करत आहे, त्याजागी मी असते तर मी तिला मारलंच असतं. रणबीरचं पात्र तर फक्त त्या स्त्रीला स्वतःचे बूट चाटायला सांगतं, इतकंच नव्हे तर जेव्हा ती तसं करायलाही तयार होते तेव्हा तो तिथून निघून जातो अन् आपल्या भावांना तिला तिच्या इच्छित स्थळी सोडायला सांगतो, यावरुन आपल्याला लक्षात येतं की ते पात्र नेमकं काय काय सहन करत आहे.” चित्रपटातील या आणि अशा कित्येक सीन्सवरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tripti dimri speaks about her role in animal and controversial scenes avn
Show comments