Laila Majnu box office collection: सध्या अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या (Triptii Dimri) सहा वर्षांपूर्वीच्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यावेळी सुपरफ्लॉप ठरलेला हा चित्रपट आता मात्र बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. सहा वर्षांपूर्वी या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती, पण आता चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, परिणामी चित्रपटाने रिलीजनंतर चार दिवसात चांगली कमाई केली आहे. ‘लैला मजनू’ असं तृप्ती डिमरीच्या या चित्रपटाचं नाव आहे.
सहा वर्षांनंतर ‘लैला मजनू’ हा रोमँटिक चित्रपट शुक्रवारी (९ ऑगस्टला) पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने त्यावेळी त्यावेळी केलेल्या एकूण कलेक्शनपेक्षा जास्त कमाई केली आहे. अविनाश तिवारी व तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लैला मजनू’ २०१८ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर निराशाजनक कामगिरी केली होती.
अभिनेता राजपाल यादवची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
‘लैला मजनू’ची तेव्हाची अन् आताची कमाई किती?
हिमेश मंकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट देशभरात फक्त ७५ स्क्रीन्सवर पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाने ३० लाख रुपयांची ओपनिंग केली, शनिवारी ७० लाखांची कमाई केली. त्यानंतर चित्रपटाने रविवारी १ कोटी रुपये कमावले. चित्रपटाचे एकूण कलेक्शन तीन दिवसांत दोन कोटी रुपये झाले. सोमवारी या चित्रपटाने ६० लाख रुपये कमावले. चित्रपटाची चार दिवसांची कमाई २.६० कोटी रुपये झाली आहे. चित्रपटाने २०१८ मध्ये २.१६ कोटी रुपये कमावले होते, त्या तुलनेत आता चित्रपटाने चार दिवसांत चांगली कमाई केली आहे.
तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…
लैला व कैस यांची लव्ह स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यामध्ये सुमित कौल, साहिबा बाली, दुवा भट्ट, अबरार काझी या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘लैला मजनू’ हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
१५ ऑगस्टला प्रदर्शित होणार तीन मोठे चित्रपट
हा चित्रपट साजिद अलीने दिग्दर्शित केला होता आणि त्याचा चित्रपट निर्माता इम्तियाज अली होता. ‘लैला’ मजनू’ चित्रपटाला आणखी दोन दिवस बॉक्सवर कोणतीही स्पर्धा नाही, त्यामुळे हा चित्रपट किती कमाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. १५ ऑगस्ट रोजी श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांचा ‘स्त्री २’, अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहम व शर्वरीचा ‘वेदा’ प्रदर्शित होणार आहे.