संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे जितके कौतुक झाले, तितकीच त्याच्यावर टीकाही झाली. या सगळ्यात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri)ला मोठी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून अभिनेत्रीला वेगळी ओळख मिळाली. आता एका मुलाखतीत तिने, या चित्रपटानंतर तिला नकारात्मकेचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

तृप्ती डिमरीने नुकतीच रणवीर अलाहाबादियाच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी तिने, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या नकारात्मकतेचा सामना करणे कठीण झाले होते, असे सांगितले. तृप्तीने म्हटले, “नकारात्मक कमेंट्स आणि द्वेष यांचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. त्यामुळे माझे जे कौतुक होत होते, त्यावर मी लक्ष देऊ शकले नाही.”

पुढे बोलताना तृप्तीने म्हटले, “‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाआधी मला कोणत्याही प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागला नव्हता. परंतु, या चित्रपटानंतर माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण, मला वाटते की, तुम्ही मुख्य प्रवाहात असण्याचा हा साइड इफेक्ट आहे. आता मी खूश आहे. कारण- मला महत्त्वाच्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे. मात्र, सुरुवातीला हे कठीण होते. कारण- ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या आधी मी जे चित्रपट केले, त्यामध्ये माझ्यावर कोणतीही टीका झाली नव्हती. मी कमेंट्स वाचायचे आणि हा विचार करून आनंदित असायचे की, लोक आपल्याबद्दल चांगल्या गोष्टी लिहीत आहेत. आता आयुष्यात काहीच समस्या उरली नाही.”

याबाबत अधिक बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “त्यानंतर मी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात काम केलं आणि मला टीकेचा सामना करावा लागला. मी सगळ्या कमेंट्स वाचायचे. मला आठवतंय एक महिना मला समजतच नव्हतं की, हे का घडत आहे. मी फक्त माझं काम केलं आहे आणि त्यासाठी माझ्याबद्दल इतकं वाईट का बोललं जात आहे. तो महिना माझ्यासाठी कठीण होता. कारण- अर्धं जग माझं यश साजरं करीत होतं आणि अर्धं जग माझ्याबद्दल वाईट बोलत होतं. मी सकारत्मक गोष्टीपेक्षा नकारात्मकतेकडे लक्ष दिले. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी कमीत कमी दोन-तीन दिवस रडत होते. मला याची सवय नव्हती. हे सगळं अचानक घडत होतं. मी असा कधी विचारच केला नव्हता की, मला या सगळ्याचा सामना करावा लागेल. मी संवेदनशील व्यक्ती आहे. त्या सगळ्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला.”

हेही वाचा: “ट्रॉफी हातात आली पण नाचू दिलं नाही…”, विजेता घोषित केल्यावर मंचावर काय घडलं? सूरजने सांगितला किस्सा

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटानंतर तिने करण जोहर दिग्दर्शित बॅड न्यूज या चित्रपटात काम केले. त्यामध्ये तिच्याबरोबर विकी कौशलदेखील मुख्य भूमिकेत होता. आता ती लवकरच ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात राजकुमार रावबरोबर दिसणार आहे. त्याबरोबरच, भूल भुलय्या ३ आणि धडक २ मध्येदेखील ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.