सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘तुंबाड’ चित्रपटाची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली होती; मात्र प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत चित्रपट प्रदर्शित झाला असताना त्याकडे पाठ फिरवली. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी तो पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाविषयीची चर्चा वाढली आणि “हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला हवा होता,” असं बऱ्याच जणांनी म्हटलं. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण झाली. कारण- २०२४ मध्ये अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले; ज्यात ‘तुंबाड’चा समावेश होता. पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘तुंबाड’ने कमाईचे नवे उच्चांक गाठले आहेत.
तीन आठवड्यांपूर्वी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करीत आहे. या चित्रपटाने १३ सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा प्रदर्शित झाल्यापासून भारतात ३०.४ कोटी रुपयांचा एकूण गल्ला जमवला आहे.
चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी ते रविवारी २.८ कोटी रुपये कमावले; तर याच आठवड्यात सोमवार ते गुरुवारपर्यंत १.९ कोटी रुपये कमावले. ‘तुंबाड’च्या पुनर्प्रदर्शनाला प्रेक्षकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे जुने चाहते आणि नवीन प्रेक्षकही या चित्रपटाचा पुन्हा मोठ्या पडद्यावर अनुभव घेत आहेत. पुनर्प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याला तोंडी प्रचाराचीही मोठी साथ मिळाली आहे.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ हा लोककथेवर आधारित भयपट आहे. राही अनिल बर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, आदेश प्रसाद यांनी सह-दिग्दर्शन केले आहे. सोहम शाह, आनंद एल. राय, मुकेश शाह व अमिता शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आणि सोहम शाहने त्यात प्रमुख भूमिका साकारली आहे.
हेही वाचा…“ती पद्धत म्हणजे बालिशपणा…”, शाहरुख खानने आमिर खानवर केलेली टीका; अभिनेत्याने दिलेलं असं उत्तर की…
अनेक पुरस्कार सोहळ्यांत नामांकने
‘तुंबाड’ने ६४ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये आठ नामांकने मिळवून, सर्वोत्तम छायाचित्रण, सर्वोत्तम कला दिग्दर्शन व सर्वोत्तम ध्वनिनिर्मिती, असे तीन पुरस्कार पटकावले होते. या चित्रपटाने समीक्षकांची वाहवा मिळवली. त्यांच्याकडून रोमहर्षक कथानक, अप्रतिम निर्मिती व नेत्रदीपक छायाचित्रण या वैशिष्ट्यांसाठी या चित्रपटाची विशेष प्रशंसा करण्यात आली. तसेच, हा चित्रपट ७५ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘क्रिटिक्स वीक’ विभागात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला.
राही अनिल बर्वे नव्या व्यापात; ‘तुंबाड २’साठी दिग्दर्शक कोण?
राही अनिल बर्वे सध्या ‘पहाडपांगिरा’ व ‘पक्षितीर्थ’ या त्यांच्या नवीन कलाकृतींवर काम करीत आहेत. त्यामुळे ते ‘तुंबाड’च्या पुढील भागाचं दिग्दर्शन करणार नसून, त्यांनी ‘तुंबाड २’साठी सोहम शाहला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुंबाड’ पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.