अभिनेता अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी खिलाडी कुमार आपल्या कुटुंबाबरोबर लंडनमध्ये व्हेकेशनचा आनंद घेत आहे. अक्षय व ट्विंकलने लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली आहे. तिने इन्स्टाग्रामवर या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
ऑस्कर २०२४ साठी ‘या’ भारतीय चित्रपटाची अधिकृत एंट्री, ज्युरींकडून घोषणा
व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना, ऋषी सुनक आणि अक्षय कुमारने पोज दिली आहे. ट्विंकलने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “मला हील्स घालणं आणि नटणं फार आवडत नाही. पण आजची संध्याकाळ पायाच्या बोटांना झालेल्या जखमांना पात्र होती. सुधा मूर्ती माझ्या हिरो आहेत, पण त्यांचे जावई पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटून खूप आनंद झाला.”
हा व्हिडीओ शेअर करताना अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री-लेखिला ट्विंकल खन्नाने लेखिका सुधा मूर्ती यांचे मनापासून कौतुक केले आहे. ट्विंकलचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा, रवी किशन, कुमुद मिश्रा यांच्याही भूमिका आहेत.