अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) हा सध्या त्याच्या स्काय फोर्स चित्रपटामुळे चर्चेत आहे. २४ जानेवारी २०२५ ला हा चित्रपट रिलीज झाला आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेत्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. सोशल मीडियावर पत्नी ट्विंकल खन्ना(Twinkle Khanna)बरोबर फोटो शेअर करताना दिसतो. ट्विंकल खन्नादेखील तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली दिसते. आता ट्विंकल खन्नाने पती व अभिनेता अक्षय कुमार बाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
काय म्हणाला अक्षय कुमार?
अक्षय कुमारने गेल्या वर्षी एका मुलाखतीत तो उजव्या विचारसरणीचा आणि ट्विंकल डाव्या विचारसरणीचा विचार करते, असे म्हटले होते. नुकतेच ट्विंकल खन्नाने तिला त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय विचारांबद्दल प्रश्न विचारले जातात, यावर वक्तव्य केले आहे. तिने असे म्हटले की जे लोक असे काही प्रश्न विचारतात, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आम्ही स्वतंत्र व्यक्तीमत्व आहोत. आमची वेगवेगळी विचारसरणी असू शकते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या कॉलममध्ये ट्विंकल खन्नाने लिहिले की अक्षय कुमार असा लहान मुलगा आहे, जो मी दिलेल्या सूचनांचे पालन करतो. जर त्याला सांगितले की बाळा रस्त्याच्या डाव्या बाजूने चाल. मी तुला फ्रूटी घेऊन देते, असे म्हटले तर अक्षय तिचे ऐकतो. असा विचार करणाऱ्यांवर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी ९० तास काम करण्याबाबत वक्तव्य केले होते. यावर टिप्पणी करताना ट्विंकल खन्नाने म्हटले की ती अशा काही मोजक्या महिलांपैकी आहे, ज्यांच्या नवऱ्याचं रविवारच्या दिवशीही त्यांच्याकडं लक्ष जात नाही. पुढे खुलासा करत अभिनेत्रीने म्हटले की अक्षय कुमार टीव्ही पाहत असतो. पुढे अभिनेत्रीने असेही लिहिले की, पुरुषांच्या कृती व निवडीसाठी अनेकदा समाज महिलांना जबाबदार धरण्याची संधी शोधत असतो. जर पुरुषाचे वजन वाढले किंवा कमी झाले. घर नीटनेटके असेल कि पसारा असेल किंवा महिलेने काम करण्याचा निर्णय घेतला किंवा काम न करण्याचे ठरवले.तरी त्याचा दोष महिलांवर येतो. एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी असल्यामुळे काय वाटते,असे जे प्रश्न तिला विचारण्यात येतात, यावर तिने नाराजी व्यक्त केली. याबरोबरच, अमेरिकेचे अध्यक्ष LGBTQIA+ या समूहातील व्यक्तींचे जन्मजात नागरिकत्व रद्द करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यावरदेखील ट्विंकल खन्नाने टीका केली.
ट्विंकल खन्नांने लिहिलेल्या या कॉलममध्ये काही प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे देत, महिलांना कसे जबाबदार धरले गेले आहे, यावरही भाष्य केले आहे. यामध्ये विराट कोहलीच्या खराब खेळासाठी अनुष्का शर्माला कसे जबाबदार धरले होते, मेलानिया ट्रम्प यांच्यावर त्यांच्या पतीच्या धोरणांसाठी टीका केली होती, अशी काही उदाहरणे अभिनेत्रीने दिली आहेत.
काही दिवसांपूर्वी लार्सन अँड टुब्रोच्या अध्यक्षांनी म्हटले होते की रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप वाटतो. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो. घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.
दरम्यान, आता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला स्काय फोर्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.