सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारी २०२५ रोजी घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराने हल्ला केला. त्यानंतर सैफवर लिलावती रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सध्या सैफ रुग्णालयातून घरी परतला असून बरा होत आहे, मात्र या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना घरी नव्हती. तर काही रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे की करीना घरी होती, परंतु ती इतकी नशेत होती की आपल्या पतीला मदत करू शकली नाही.
आता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) या तर्कवितर्कांवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विंकलने ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी लिहिलेल्या एका कॉलममध्ये म्हटले आहे की, “पुरुषांबरोबर घडणाऱ्या प्रत्येक समस्येसाठी महिलांना, विशेषतः पत्नींना दोष दिला जातो.” याचे उदाहरण देत ट्विंकलने नमूद केले की, “विराट कोहली चांगली कामगिरी करू शकला नाही म्हणून अनुष्का शर्माला दोष दिला जातो. ट्विंकलने करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घटनेवर भाष्य करताना म्हटले की, “सैफवर हल्ला झाला त्यावर करीनाबद्दलच्या निराधार चर्चा हास्यास्पद आहेत.”
ट्विंकलने असेही लिहिले की, करीनासंदर्भातील या वेडसर सिद्धांतांना थांबवणे कठीण आहे. तिने असेही नमूद केले की लोकांना सैफवर झालेल्या हल्ल्याचा दोष करीनाला देण्यात आनंद होत आहे. ट्विंकलने पुढे लिहिले की, सैफवरील हल्ल्यामुळे प्रत्येक घरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ती स्वतः झोपण्यापूर्वी दरवाजाच्या लॉकची दोन वेळा खात्री करून पाहते, असेही तिने सांगितले.
सैफ अली खानवर १६ जानेवारी २०२५ रोजी त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला होता. हल्ला झाल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले व या प्रकरणाचा सुरू करण्यात आला. सैफ अली खानला घरी आणल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवत या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे.