बॉलिवूडमध्ये ‘टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी’ नावाची एक संस्था कार्यरत असते. ही संस्था देशातील वेगवेगळ्या शहरातील उत्तम कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून देते आणि त्यांच्याबरोबर एक करारदेखील करते. बहुतेक प्रत्येक निर्मात्यांची अशी एक स्वतंत्र संस्था असतेच. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय संस्था ही यश राज फिल्म यांची आहे. गेल्या काही वर्षात या संस्थेने अनुष्का शर्मा, वाणी कपूर, रणवीर सिंग, परिणीती चोप्रासारख्या कित्येक कलाकारांना पुढे आणलं.
आता याच संस्थेशी निगडीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. यशराजच्या ‘टॅलेंट मॅनेजमेंट विंग’मधून अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हे बाहेर पडले आहेत. या दोघांनाही चित्रपटसृष्टीत यशराज स्टुडिओज तर्फे लॉंच करण्यात आलं होतं. तेव्हाच या दोघांबरोबर एक करारही करण्यात आला होता. त्या करारानुसार या दोन्ही कलाकारांनी यश राज फिल्म्सबरोबरच चित्रपट करायचे, अन्य कोणत्या निर्मात्याकडे काम करण्यासाठी त्यांना यशराज कडून रीतसर परवानगी घ्यावी लागत असे. रणवीर सिंग आणि परिणीती चोप्रा हे दोघेही आता यश राज फिल्मचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं जात आहे.
आणखी वाचा : “धारावी फक्त अंडरवर्ल्ड….” सुनील शेट्टीच्या बहुप्रतीक्षित ‘धारावी बँक’ चा थरारक टीझर प्रदर्शित
रणवीर सिंग संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर एक चित्रपट करणार असून, अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र २’मध्येसुद्धा रणवीर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय यश राज बरोबर केलेला रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ सपशेल आपटल्याने रणवीरला यश राज फिल्मने बाहेरचा रस्ता दाखवल्याचं म्हंटलं जात आहे. शिवाय परिणीती चोप्रा हीने तर यश राज फिल्मबरोबर कित्येक चित्रपट करून गेल्या ४ ते ५ वर्षात तिचा एकही चित्रपट हिट न ठरल्याने तिलाही यशराज कडून श्रीफळ मिळाल्याचं ऐकिवात आहे. परिणीती ‘उंचाई’ या राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटातून समोर येणार आहे.
या संदर्भात ‘यश राज फिल्म’कडून आणि त्यांच्या ‘टॅलेंट मॅनेजमेंट विंग’कडून मात्र वेगळीच गोष्ट समोर आली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार रणवीर आणि परिणीती यांचा करार जरी संपुष्टात आला असला तरी ‘यश राज फिल्म’ हे त्यांचं घर आहे, आणि या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी सदैव उघडेच असतील असं स्पष्टीकरण यश राज फिल्म्सतर्फे देण्यात आलं आहे. एकूणच ‘यश राज फिल्म’ अंतर्गत तयार होणारे बरेचसे चित्रपट फ्लॉप होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. शिवाय आता शाहरुखच्या आगामी ‘पठाण’कडूनही ‘यश राज’च्या खूप अपेक्षा आहेत. पठाण पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.