दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी व आदित्य तसेच उदय चोप्राच्या आई पामेला चोप्रा यांचं गुरुवारी २० एप्रिल रोजी निधन झालं. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकार चोप्रा कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन करत आहेत, तसेच पामेला यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, रणवीर सिंग, विकी कौशल, शबाना आझमी, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक कलाकार पामेला चोप्रा यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले. या कलाकारांनी आदित्य चोप्रा, उदय चोप्रा व राणी मुखर्जीची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे उदय चोप्रा हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी उदय चोप्राला ट्रोल करत आहे. आईच्या निधनानंतर हसणारा पहिला मुलगा पाहिला, अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.
विरल भयानीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आमिर खान व किरण राव चोप्रांच्या घरी पोहोचल्याचं दिसतंय. आमिर व किरणने उदय चोप्राची भेट घेत त्याला मिठी मारली. यावेळी उदय त्यांच्याशी बोलताना हसताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. ‘आपल्या आईच्या निधनावर हसणारा पहिला मुलगा,’ ‘हा का हसतोय’, ‘निर्लज्ज उदय चोप्रा, आईच्या निधनावर हसतोय’, ‘हा अंबानीचा इव्हेंट नाही, तर अंत्यसंस्कार आहे’, ‘अरे तुझ्या आईचं निधन झालंय, लग्नाचं रिसेप्शन नाही’, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
पामेला चोप्रा काही दिवसांपासून आजारी होत्या, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण त्यांची प्रकृती खालावली व त्यांचं निधन झालं. पामेला ७४ वर्षांच्या होत्या.