सुप्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आहेत. उदित यांच्या लाइव्ह शोमधील एका व्हिडीओत ते सेल्फी काढायला आलेल्या महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झड उठली. आता या संपूर्ण प्रकरणावर उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘सोना कितना सोना है’, ‘परदेसी-परदेसी’ आणि ‘तुझको ना देखूं’ यांसारख्या अगणित हिट गाण्यांना आपला आवाज देणारे गायक उदित नारायण सध्या त्यांच्या एका व्हायरलमुळे टीकेचे धनी ठरले आहेत. ७९ वर्षीय उदित व्हिडीओत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आपल्या महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?

उदित नारायण यांचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लाइव्ह कॉन्सर्टचा आहे. या व्हिडीओत उदित नारायण त्यांच्या महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिला चाहत्यांबरोबर फोटो काढल्यानंतर त्यांनी किस केले. त्यापैकी एका चाहतीने त्यांना गालावर किस केलं, मग उदित यांनी तिच्या ओठावर किस केलं. कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला असून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

उदित नारायण यांची व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया

व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना गायक उदित नारायण म्हणाले, “चाहते खूप वेडे असतात. आम्ही लोक असे नाही. मी सभ्य माणूस आहे. काही लोक या गोष्टी करतात आणि त्याद्वारे आपले प्रेम व्यक्त करतात. पण आता ही गोष्ट व्हायरल करून काय मिळणार? गर्दीत खूप लोक असतात, आमच्यासोबत बॉडीगार्डही असतात, पण चाहत्यांना वाटतं की त्यांना आम्हाला भेटण्याची संधी मिळतेय, म्हणून काही हात मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर कोणी हाताचं चुंबन घेतं. हे सगळं त्यांचं प्रेम आहे. याकडे फार लक्ष देऊ नये.”

उदित नारायण म्हणाले की ते स्टेजवर गातात, तेव्हा चाहते फार आनंदी होतात आणि आपल्याला त्यांना आनंदी ठेवायला आवडतं. “माझ्या कुटुंबाची प्रतिमा अशी आहे की प्रत्येकाला वाटतं काहीतरी वाद व्हावा. आदित्य (उदित नारायण यांचा मुलगा) शांत आहे आणि तो वादात सापडत नाही. जेव्हा मी स्टेजवर गातो तेव्हा लोक खूप खूश होतात, चाहते माझ्यावर प्रेम करतात, त्यामुळे त्यांना कार्यक्रमात आनंदी ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो,” असं उदित म्हणाले.

चाहतीला ओठांवर किस केल्याच्या प्रसंगाबद्दल उदित म्हणाले की ते अचानक घडलं. “मला बॉलीवूडमध्ये ४६ वर्षे झाली आहेत, माझी प्रतिमा अशी नाही (की मी चाहत्यांना जबरदस्तीने किस करतो). खरं तर, माझ्या चाहत्यांनी माझ्यावर केलेले प्रेम पाहून मी हात जोडतो, स्टेजवर असताना मी नतमस्तक होतो. अशी वेळ पुन्हा येईल की नाही हा विचार मी करत असतो,” असं उदित यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं.

Story img Loader