उदित नारायण हे नाव आलं की आपल्याला आमिर खानचा निरागस चेहरा आणि ‘पापा कहते हैं बडा नाम करेगा’ हे गाणं आठवतंच. या गाण्यानेच उदित नारायण यांना अमाप प्रसिद्धी दिली. ‘कयामत से कयामत तक’ हा सिनेमा आला आणि उदित नारायण यांचं गाणं त्यांचा आवाज बॉलिवूडला मिळाला. आज याच हरहुन्नरी कलाकाराचा वाढदिवस आहे. लता मंगेशकर यांनी उदित नारायण यांना एक खास भेट दिली होती. जी त्यांनी जपून ठेवली आहे. यासह काही माहीत नसलेले किस्से आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
गाणं ही दैवी देणगी आहे
गाता गळा लाभणं हे दैवी देणगी असते असं मला वाटतं. मी देवाचे आभार मानतो की त्याने मला गाता गळा घेऊन पाठवलं. आपल्या आवाजात वेगळेपण असतं, आपण गातो त्यामागे मेहनत असते. माझ्या पिढीतल्या जवळपास प्रत्येकाला मी आवाज दिला आहे. मी कायम हा प्रयत्न करतो की जो कलाकार समोर आहे त्याप्रमाणे गाणं म्हणावं. आपल्या डोक्यात, मनात सकात्मक विचार केला की आपल्याला गोष्टी सहज होतात. दिग्दर्शक, निर्माते मला सांगतात. सिनेमात कलाकार कोण आहे, गाणं कसं आहे? हे सांगतात. मी दिग्दर्शक जे सांगतात ते लक्षपूर्वक ऐकतो. तसंच जे संगीतकार ज्या पद्धतीने सांगतात त्याप्रमाणे आम्ही गातो. कलाकार कोण आहे याचा विचार करावा लागतो. शब्दांचं सौंदर्य कसं आहे, दिग्दर्शकाला काय हवं आहे? अशा सगळ्याच गोष्टी विचारात घेऊन आम्ही गातो. ज्या कलाकारासाठी आम्ही गाणं म्हणतो त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. शाहरुख खान गाणं म्हणत असेल तर त्याची स्टाईल कशी आहे ते लक्षात घेत असतो. त्याप्रमाणे गाणं सोपं होतं. असं उदित नारायण यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
कलाकार यशस्वी होतो तेव्हा त्याची जबाबदारी वाढते
माणूस जेव्हा कलाकार म्हणून यशस्वी होतो तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा वाढतात. मी जेव्हा लोकांकडून माझी स्तुती ऐकतो माझं गाणं त्यांना आवडतं तेव्हा माझ्यावरची जबाबदारी जास्त वाढली असं मला वाटतं. त्यामुळे मी रोज चांगलं गाणं कसं म्हणेन यासाठीच मेहनत घेतो. असंही उदित नारायण यांनी सांगितलं होतं. तुम्ही जे काही काम करत आहात त्यात नियतीचा, नशिबाचा भाग पाच ते दहा टक्के असतो पण ९० टक्के आपलं प्रयत्न असतात ते सोडायचे नसतात. आपण प्रयत्न केले की यश मिळतं असं वाटत असल्याचंही उदित नारायण म्हणाले होते.
‘कहो ना प्यार है’ चा तो किस्सा
” ‘कहो ना प्यार है’ मधल्या गाण्यासाठी मला राजेश रोशन आणि राकेश रोशन यांनी बोलवलं. ऋतिक रोशनचा तो पहिला सिनेमा होता. त्यावेळी आम्ही गाणी रेकॉर्ड केली आणि मी राजेश रोशन यांना सांगितलं की हा सिनेमा म्युझिकल हिट ठरणार. त्यानंतर काही दिवस गेले. सिनेमा रिलिजचा दिवस आला. त्यादिवशी सकाळी मी ऋतिक रोशनला फोन केला आणि सांगितलं की तू आज सुपरस्टार होणार. त्यावेळी ऋतिक म्हणाला अजून तर सिनेमा प्रदर्शित झाला नाही. तुम्ही माझी मस्करी करत आहात का? त्यावर मी त्याला म्हणालो, मला मनापासून वाटतं आहे, म्हणून सांगतोय. जेव्हा सिनेमा हिट झाला तेव्हा ऋतिकने मला फोन केला आणि म्हणाला माझ्यासाठी अशीच स्वप्नं तुम्ही पाहात जा.” असा किस्सा उदित नारायण यांनी एका चॅनलच्या मुलाखतीत सांगितला होता.
उदित नारायण यांचा ६८ वा वाढदिवस आज आहे. १ डिसेंबर १९५५ मध्ये बिहारच्या सुपौलमध्ये त्यांचा जन्म झाला. उदित नारायण हे मैथिली ब्राह्मण कुटुंबात जन्मले. गायक होण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत केली आहे. त्यांच्या काळात एक काळ असाही होता जेव्हा काठमांडू रेडिओ स्टेशनमध्ये त्यांनी महिना १०० रुपये अशी नोकरीही केली होती. १०० रुपये पुरायचे नाहीत. त्यामुळे मग त्यांनी हॉटेलमध्ये गाणं म्हणण्यास सुरुवात केली. म्युझिकल स्कॉलरशिप मिळाल्यानंतर ते मुंबईत आले.
उदित नारायण यांनी गायक होण्यासाठी केला संघर्ष
उदित नारायण यांचे वडील शेतकरी होते. जेव्हा उदित ८ ते १० वर्षांचे होते तेव्हा ते रेडिओ ऐकायचे. मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, महेंद्र कपूर हे सगळे रेडिओत बसून गातात असं त्यांना वाटायचं. मात्र हळूहळू समज आली आणि गायक बनण्याचा त्यांचा प्रवास सुरु झाला. वयाच्या ३३ वर्षापर्यंत उदित नारायण यांनी भरपूर स्ट्रगल केलं. १९८० मध्ये त्यांना मोहम्मद रफींसह काम करण्याची संधी मिळाली. उन्नीस बीस साठी त्यांनी गाणं गायलं. १९८७ पर्यंत त्यांना मोठा ब्रेक मिळाला नाही. १० वर्षांनी त्यांना ब्रेक मिळाला. तो सिनेमा होता ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातल्या सगळ्या गाण्यांना आमिर खानसाठी उदित नारायण यांनी गायली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. उदित नारायण यांच्या वडिलांना वाटायचं की उदित यांनी गाणं सोडू नये पण शिक्षण घेऊन इंजिनिअर व्हावं आणि पैसे कमवावेत. मात्र उदित नारायण यांनी गायक होण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. अखेर त्यांना यश मिळालं, आज ते एक यशस्वी गायक म्हणून ओळखले जातात. उदित नारायण यांच्या आवाजाची जादू आजही तरुणाईला भावते. उदित नारायण यांनी आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, सनी देओल, गोविंदा यांच्यासह अनेकांसाठी पार्श्वगायन केलं आहे. एकाहून एक सुपरहिट गाणी त्यांनी म्हटली आहेत.
लता मंगेशकरांकडून मिळालं होतं खास गिफ्ट
“उदित नारायण यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की लता मंगेशकर यांच्याशी पहिली भेट पुण्यात झाली होती. त्यानंतर बंगळुरु या ठिकाणी त्यांच्याशी पुन्हा एका कार्यक्रमात भेट झाली. तो दिवस मी कधीही विसरणार नाही. कारण त्या दिवशी माझा वाढदिवस म्हणजेच १ डिसेंबर होता. लता मंगेशकर यांना जेव्हा समजलं की माझा वाढदिवस आहे तेव्हा त्यांनी मला सोन्याची एक चेन भेट म्हणून दिली. त्यानंतर माझं नाव त्यांनी ‘प्रिन्स ऑफ प्ले बॅक सिंगर’ असं ठेवलं. लता मंगेशकरांकडून मला ती खास भेट मिळाली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. माझ्यासाठी तो आशीर्वादच ठरला ती चेन मी आजही सांभाळून ठेवली आहे” असं उदित नारायण यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं.
आणि लतादीदी माझ्या घरी आल्या
लता मंगेशकर यांच्यासह उदित नारायण यांनी २०० हून अधिक गाणी गायली आहेत. तसंच त्यांच्यासह गाणं म्हणायला मिळणं ही मी भाग्याची गोष्ट समजतो. एखाद्या लहान भावाप्रमाणे त्या माझ्यावर माया करत. असंही उदित नारायण म्हणाले होते. एवढंच नाही ज्या काळात मी काम मिळवण्यासाठी धडपड करायचो तेव्हा दुरुन काही वेळा लता मंगेशकर यांना पाहिलं होतं. त्यांच्या बरोबर उभं राहून गाता आलं हे मी माझं भाग्य समजतो. ‘वीर झारा’ सिनेमासाठी जेव्हा आम्ही ‘जानम देख लो मिट गयीं दूरियां’ हे गाणं म्हटलं तेव्हा लतादीदींचा फोन आला होता. त्या म्हणाल्या मी तुमच्या घरी येते. मला आधी वाटलं की दीदी बहुदा माझी फिरकी घेत आहेत. मात्र पुढच्या १५ मिनिटात त्या आल्या आणि माझ्या घरी त्या चार तास थांबल्या होत्या. त्यावेळी मला वाटलं की देवी सरस्वतीच माझ्या घरी आली आहे. असा किस्साही उदित नारायण यांनी इंडिया टुडेच्या मुलाखतीत सांगितला होता.