लोकप्रिय गायक उदित नारायण(Udit Narayan) हे त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात. ‘क्या मौसम आया है’, ‘गुन गुना रे’, ‘सोना कितना सोना है’, ‘यह बंधन तो’, ‘मेरा रंग दे बसंती’, ‘लाल दुपट्टा’, ‘मुझसे शादी करोगी’, या आणि अशा अनेक गाण्यांना उदित नारायण यांनी आवाज दिला आहे. त्यांनी गायलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. फक्त भारतातच नाही, तर जगभरात त्यांच्या गाण्याचे चाहते आहेत. विविध ठिकाणी त्यांच्या कॉन्सर्ट होताना दिसतात. त्यांच्या कार्यक्रमांना लोकांची खूप गर्दी असल्याचे दिसते. अशाच एका कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी मोठा व्हायरल झालेला दिसला. उदित यांच्या लाइव्ह शोमधील एका व्हिडीओत ते सेल्फी काढायला आलेल्या महिला चाहत्यांना किस करताना दिसले होते. त्यावरून मोठा वादही झाला होता आणि उदित नारायण यांना ट्रोल करण्यात आले होते. उदित नारायण यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिले होते. आता एका कार्यक्रमात त्यांनी यावर पुन्हा एकदा वक्तव्य केले.
हा चित्रपट आता प्रदर्शित होणं…
‘पिंटू की पप्पी’ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात उदित नारायण यांनी हजेरी लावली होती. त्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण चित्रपटाच्या नावावर विनोदी पद्धतीने टिप्पणी करताना दिसत आहेत. त्यामध्ये त्यांच्याबरोबर कोरिओग्राफर गणेश आचार्यदेखील दिसत आहेत. उदित नारायण यांनी म्हटले, “यांनी काय शीर्षक ठेवलं आहे. तुम्ही शीर्षक बदललं पाहिजे. पप्पी ठीक आहे, पिंटू की पप्पी हे सुंदर नाव आहे. पण, हे उदित की पप्पी तर नाही? हा चित्रपट आता प्रदर्शित होणं हा मोठा योगायोग आहे”, असे म्हणत त्यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर विनोदी पद्धतीने वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे.
पुढे व्हायरल झालेल्या त्यांच्या व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना उदित नारायण यांनी म्हटले, “जो व्हि़डीओ तुम्ही बघत आहात, तो ऑस्ट्रेलियातील दोन वर्षांपूर्वीचा जुना आहे.” त्यानंतर त्यांनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.
उदित नारायण यांचा महिला चाहत्यांना किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ई-टाइम्सबरोबर बोलताना त्यांना या सगळ्याबद्दल ओशाळल्यासारखं वाटत नसल्याचे वक्तव्य केले होते. “मला त्याबद्दल पश्चात्ताप किंवा ओशाळल्यासारखे का वाटावे? तुम्हाला माझ्या आवाजात दु:ख वाटते आहे का? हे काहीतरी घाणेरडे किंवा कुठेतरी गुप्तपणे काहीही केलेले नाही. तो सार्वजनिक ठिकाणचा व्हिडीओ आहे. माझे मन निर्मळ आहे. जर माझ्या शुद्ध प्रेमाकडे काही लोक घाणेरड्या दृष्टिकोनातून बघत असतील, तर मला त्यांच्याप्रति दु:ख वाटते”, असे म्हणत त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले होते.