Ujjwal Nikam Biopic : १९९३ चा बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २००८ मधील २६/११ मुंबई हल्ला, तसंच २०१६ च्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यासारख्या अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकरणात सरकारी वकिलाची भूमिका बजावणारे प्रसिद्ध वकील म्हणजे उज्ज्वल निकम. याच उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित लवकरच बायोपिक येणार आहे. या बायोपिकचं दिग्दर्शन दिनेश विजान करणार आहेत.

उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमधून आमिर खानची एक्झिट

गेल्या वर्षापासून उज्ज्वल निकम यांच्यावरील बायोपिकची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारण्यासाठी आमिर खानला विचारण्यात आल्याचे बोलले जात होते. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटापूर्वी आमिरने उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकसाठीही होकार दिला होता. परंतू, आता त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे समोर येत आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, अभिनेत्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला होता; पण आता तो या चित्रपटातून बाहेर पडणार आहे.

अभिनेता आमिर खान (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसणार राजकुमार राव

मिड-डेच्या वृत्तानुसार, आमिर खान आता उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा भाग नाही. पण तो निर्माता म्हणून या चित्रपटाचा भाग असेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे आमिरनंतर आता दिग्दर्शक दिनेशने त्याच्या आवडता अभिनेता राजकुमार रावला या चित्रपटात घेण्याचा विचार केला आहे असं म्हटलं जात आहे. उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेसाठी राजकुमार राव अगदी योग्य आहे, त्यामुळे त्याने ही भूमिका करावी असं दिनेशला वाटतं.

अभिनेता राजकुमार राव (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

राजकुमार राव आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त

उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेसाठी दिनेशने राजकुमार रावशी बोलल्याचेदेखील म्हटलं जात आहे. पण आता राजकुमार राव सध्या दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता एका खेळाडूच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याने तो यासाठी खूप मेहनत घेत आहे. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये नक्की कोणता अभिनेता दिसणार? याची अनेकजण वाट पाहत आहे.

उज्ज्वल निकम यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या अनेक कैद्यांना जन्मठेप आणि अनेक दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कायदेशीर क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २०१६ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले आहे. अशातच आता त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे.