जान्हवी कपूर ‘उलझ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळत होते. यादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे ती मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाली जान्हवी कपूर?
‘आयएमडीबी'(IMDb)च्या, ‘एकमेकांना काहीही विचारा’ या भागामध्ये तिने सहकलाकार रोशन मॅथ्यूबरोबर हजेरी लावली होती. यावेळी तिला विचारण्यात आले की, तू भूमिकेसाठी कोणती गोष्ट करणार नाहीस. यावर उत्तर देताना तिने म्हटले, “मी कोणत्याही भूमिकेसाठी कधीच टक्कल करणार नाही. भविष्यात माझ्या करिअरला उंचीवर नेणारी अशी एखादी भूमिका आली, ज्यासाठी मला टक्कल करायला लागेल तर मी करणार नाही. त्यासाठी ते कॅप किंवा व्हीएफएक्सचा वापर करू शकतात.”
श्रीदेवीचा जान्हवीला सल्ला
याचे कारण असे आहे की, माझे केस माझ्या आईला खूप आवडायचे. मी ‘धडक’ चित्रपटाच्यावेळी केस कापले होते, त्यावेळी तिने मला त्याबद्दल जाब विचारला होता आणि कोणत्याही भूमिकेसाठी तू तुझे केस कापू नको, अशी समज दिली होती. ती दर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी माझ्या केसांना तेल लावत असे. तिला माझ्या केसांचा अभिमान होता. मी याआधी अनेकदा वेगवेगळ्या भूमिकांसाठी स्वत:ला इजा करून घेतली आहे. वेदना सहन केल्या आहेत, पण कोणत्याही भूमिकेसाठी मी टक्कल करणार नाही”, असे तिने म्हटले आहे. याबद्दल अधिक बोलताना तिने म्हटले आहे की, ‘उलझ’ चित्रपटातील मी साकारलेल्या भूमिकेसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुधांशू यांना वाटत होते की, मी माझे केस कापले पाहिजेत. पण, मी तसे केले नाही.
दरम्यान, जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘उलझ’ हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याचे कौतुक झाले होते. ट्रेलरमध्ये पाहिल्याप्रमाणे चित्रपटात जान्हवी कपूर सुहानाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तरुण डेप्युटी हाय कमिशनर म्हणून सुहाना काम करताना दिसत आहे; जी लंडन दूतावासातील कठीण मोहिमेवर बारीक नजर ठेवते. ‘उलझ’ चित्रपटात अभिनेता गुलशन देवैया एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. त्याबरोबरच रोशन मॅथ्यूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये गुप्तहेरांचे जीवन कसे धोक्यात येते आणि सुहानाला जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, याबद्दलची गोष्ट पाहायला मिळत आहे. सुधांशु सारिया दिग्दर्शित ‘उलझ’ चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.