बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता आज (१६ एप्रिल) आपला ४३वा वाढदिवस साजरा करत आहे. लारा दत्ता आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली, तरी एकेकाळी तिने सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अभिनयाची पार्श्वभूमी नसताना देखील लाराने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०००मध्ये लारा दत्तने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला.
लारा दत्ताचा जन्म १६ एप्रिल १९७८ रोजी गाझियाबादमध्ये झाला. तिचे वडील एलके दत्ता हवाई दलात अधिकारी होते. लाराचे वडील पंजाबी आहेत. तर आई अँग्लो इंडियन आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी लाराने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. साल २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर लारा रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या या विजेतेपदामागील कथाही खूप रंजक आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी अंतिम फेरीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्यात आला होता आणि स्पर्धकांच्या उत्तरांच्या आधारे विजेत्याचा निर्णय घ्यायचा होता. असाच एक अवघड प्रश्न लारा दत्ताला विचारण्यात आला, ज्याचे तिने इतक्या सुंदर पद्धतीने उत्तर दिले की तिला स्पर्धेची विजेती घोषित करण्यात आले.
काय होता प्रश्न?
लाराला प्रश्न विचारण्यात आला, ‘मिस युनिव्हर्स स्पर्धेला बाहेरुन विरोध करण्यात येत आहे. लोकांच्या मते महिलांचा अपमान केला जात आहे. पण ते चुकीचे आहेत हे तुम्ही तुमच्या विरोधकांना कसे पटवून द्याल.” यावर उत्तर देताना लारा म्हणाली की, मला वाटते की अशा स्पर्धांमुळे आमच्यासारख्या तरुण महिलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. मग तो व्यवसाय, सशस्त्र दल किंवा राजकारणात असो. लाराचे हे उत्तर तिथे उपस्थित असलेल्या परिक्षकांना खूप आवडले, अन् लारा मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती बनली.
लाराने आपल्या अभिनय प्रवासात ‘नो एंट्री’, पार्टनर’, ‘मस्ती’, ‘भागम भाग’, ‘हाऊसफुल’, ‘चलो दिल्ली’ असे अनेक हिट चित्रपट दिले. तिने 2003 मध्ये अक्षय कुमारसोबत अंदाज या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तसेच, यासाठी लाराला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.