विचित्र कपडे आणि अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असलेली मॉडेल उर्फी जावेद मागच्या दोन दिवसांपासून वेगळ्या कारणाने चर्चेत होती. उर्फीला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले होते. तिने दुबईत सार्वजनिक ठिकाणी विचित्र कपडे परिधान केल्याने तिच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर आता उर्फीने मौन सोडत तिची बाजू मांडली आहे.
उर्फी जावेद अडचणीत! दुबई पोलिसांनी घेतलं ताब्यात, कारण….
‘झूम एंटरटेनमेंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फीने दुबई पोलिसांनी चौकशी केल्याच्या प्रकरणावर तिची बाजू मांडली आहे. “लोकेशनमध्ये काही तरी अडचण असल्याने शूट थांबवण्यासाठी पोलीस आले होते. सार्वजनिक ठिकाण असल्याने आम्हाला ठराविक वेळेसाठीच शूटिंग करण्याची परवानगी होती. प्रॉडक्शन टीमने वेळ वाढवण्याबद्दल परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे आम्हाला ते लोकेशन सोडून जावं लागलं. माझ्या कपड्यांशी त्याचा काही संबंध नव्हता. पोलिसांनी शूट थांबवल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी उर्वरित भाग शूट केला, त्यामुळे सर्व काही ठीक झालंय,” असं उर्फीने म्हटलंय.
नेमकं काय घडलं होतं?
‘फिल्मी बीट’ने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फी जावेद तिच्या आगामी काही प्रोजक्ट्सच्या शूटिंगसाठी दुबईला गेली होती. इथे तिने नेहमीप्रमाणे विचित्र कपडे परिधान करत काही व्हिडीओ शूट केले, पण तिथल्या लोकांना ते रुचलं नाही आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून उर्फीची चौकशी केली गेली होती. पण आता उर्फीने या प्रकारावर प्रतिक्रिया देत पोलीस त्या लोकेशनसाठी आल्याचं सांगितलंय.