JNU Movie Teaser: बॉलिवूडमध्ये सध्या राष्ट्रवादी विचारधारेला जोड देणाऱ्या चित्रपटांची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’पासून अशा ज्वलंत विषयांवर वेगवेगळे चित्रपट आपल्यासमोर आले आहेत. ‘द केरला स्टोरी’पासून ‘आर्टिकल ३७०’ पर्यंतच्या संवेदनशील विषयांवर चित्रपट प्रदर्शित झाले अन् त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. लवकरच आता ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळाच इतिहास लोकांसमोर येणार आहे.
अशातच आता आणखी एका वादग्रस्त विषयावर बेतलेल्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. ‘मकाहाल मुव्हीज’ आणि ‘झी म्युझिक’ लवकरच ‘जेएनयू (जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटि)’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित झालं होतं ज्यात भगव्या रंगात भारताचा संपूर्ण नकाशा पाहायला मिळालं अन् हा देशाचा नकाशा एका हातात बंदी असल्यासारखा पकडल्याचं स्पष्टपणे दिसत होतं, आता या चित्रपटाचा टीझर येऊ घातला आहे.
आणखी वाचा : JNU Movie Poster: “एक शैक्षणिक संस्था देशाचे तुकडे करू शकते?”; ‘जेएनयू’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
गेल्या काही वर्षांत देशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठात कशाप्रकारे स्टुडंट पॉलिटिक्सच्या नावाखाली देश तोडण्याचा प्रयत्न झाला, कशारीतीने देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, सरकारी यंत्रणांच्या कार्यात कशाप्रकारे अडथळा आणला गेला, धर्म-जात यावरुन किती खालच्या थराच राजकारण झालं हे सगळं या चित्रपटात उलगडण्यात आलं असल्याचं टीझरमधून स्पष्ट होत आहे. इतकंच नव्हे तर उजवी विरुद्ध डावी विचारसरणी असा संघर्षही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात थेट नावं घेऊन या संवेदनशील मुद्द्यावर भाष्य केलं गेलं असल्याचं टीझरवरुन स्पष्ट दिसत आहे. इतकंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक मोठे होर्डिंगदेखील चित्रपटातील एका सीनमध्ये पाहायला मिळत आहे. एकूणच हा चित्रपट ‘जेएनयु’ अन् भारतीय राजकारणातील त्याचं महत्त्व यावर बेतलेला असून या माध्यमातून नवे खुलासे होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, उर्वशी रौतेला, रवी किशन, रश्मी देसाई, विजय राज, सोनाली सहगलसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
एकूणच टीझरवरुन हा चित्रपट भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एका वादग्रस्त विषयाला हात घालून त्यावर थेट बाजू घेत भाष्य करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. याचे दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले असून ‘झी स्टुडिओ’ आणि प्रतिमा दत्त यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. ५ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.