अभिनेत्री अमीषा पटेल लवकरच ‘गदर २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अमीषा बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अनेक वर्षे सिनेमापासून दूर असलेली अमीषा आगामी चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखती देत आहे. एका मुलाखतीत तिने ओटीटीवरील कंटेंट समलैंगिकतेवर भर देणारा असल्याचं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून उर्फी जावेदने तिला उत्तर दिलं आहे.
‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अमीषाने ओटीटीवरील कंटेंटबाबत भाष्य केलं होतं. “एकेकाळी आपल्याला कुटुंबाबरोबर बसून चित्रपट पाहता यायचे, पण आता तसं राहिलेलं नाही. ओटीटी माध्यमांवर अपशब्द, समलैंगिकता, गे-लेस्बियन अशा प्रकारच्या सीरिजवर जास्त भर देण्यात येतो. ओटीटी सीरिजमधील बहुतांश सीन्स तुम्ही तुमच्या लहान मुलांसमवेत पाहू शकत नाही. मुलं कोणताही ओटीटी ॲप ओपन करून पाहू नयेत म्हणून पालक टीव्हीला चाईल्ड लॉक लावून ठेवतात,” असं अमीषा म्हणाली होती.
“मला मुंबई शहर आवडतं, पण…”; भरत जाधवने सांगितलं कोल्हापूरला स्थायिक होण्यामागचं कारण
अमीषाला उर्फीने प्रत्युत्तर दिलं आहे. अमीषाचा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, “गे, लेस्बियन म्हणजे काय? आपल्या मुलांना त्यापासून दूर ठेवायचे? ती जेव्हा ‘कहो ना प्यार है’ म्हणते तेव्हा तिला फक्त ‘स्ट्रेट’ लोक म्हणायचे होते. अशा संवेदनशील विषयांवर स्वतःला शिक्षित न करता बोलणारी अभिनेत्री पाहून मला खरोखरच अस्वस्थ वाटतं! २५ वर्षांपासून काम न मिळाल्याने ती खूप कडवट बनली आहे.”
![urfi javed on ameesha patel](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/urfi-javed-on-ameesha-patel.jpeg?w=340)
दरम्यान, अमीषाच्या या वक्तव्यानंतर तिला ट्रोल केलं जात आहे. एखाद्या अभिनेत्रीने संवेदनशील विषयांवर अशा पद्धतीने बोलणं योग्य नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. अमीषाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिचा ‘गदर २’ चित्रपट ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.