Urvashi Rautela Controvercy: बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमी चर्चेत असते. कधी सुंदर, स्टनिंग, ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी डान्समुळे उर्वशी चर्चेत असते. नुकतंच तिनं असं काही विधान केलं आहे, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तिच्या वक्तव्यामुळे बद्रीनाथ धामचे पंडितांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घ्या…

काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, बद्रीनाथ धामजवळ माझ्या नावाचं एक मंदिर आहे. जिथे लोक जातात आणि फुल वाहून पूजा करतात. तेव्हा सिद्धार्थने विचारलं, “हे तुझं मंदिर आहे.” तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “हो, माझं मंदिर आहे. तसंच माझी इच्छा आहे की, दक्षिण भारतातदेखील माझं एक मंदिर असावं.” उर्वशीच्या याच वक्तव्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. तिच्या वक्तव्यांवर पंडितांनी संताप व्यक्त केला आहे. “हा सर्व मूर्खपणा आहे, ते मंदिर तिचं नाही तर उर्वशी नावाच्या देवी सतीचे आहे”, असं पंडितांनी स्पष्ट केलं आहे.

ते म्हणाले की, “उर्वशी मंदिर हिंदू पौराणिक कथांमध्ये पूजनीय असलेल्या देवी सतीशी संबंधित आहे. हे १०८ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.” ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना ते म्हणाले, “हे तिचं मंदिर नाही. अशी विधाने अस्वीकार्य आहेत आणि सरकारने असे दावे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.” ब्रह्म कपाल तीर्थ पुजारी सोसायटीचे अध्यक्ष अमित सती यांनीही उर्वशीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, अशा वक्तव्यांमुळे येथील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे उर्वशी रौतेलाने माफी मागितली पाहिजे.

उर्वशी मंदिराबद्दल थोडक्यात माहिती

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बामणी गावात उर्वशी मंदिर आहे. बद्रीनाथ धामपासून एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. त्यामुळे बद्रीनाथ धामला जाणारे सर्व प्रवासी या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या मंदिरासंबंधित बऱ्याच पौराणिक कथा आहेत. नवरात्रीमध्ये या मंदिरात विशेष सोहळ्याचं आयोजन केलं आहे.

दरम्यान, उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘सॉरी बोल’ या गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सनी देओल आणि रणदीप हु़ड्डाच्या ‘जाट’ चित्रपटात उर्वशीचं हे गाणं असून प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. युट्यूबवर उर्वशीच्या या गाण्याला २६ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.