मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोनालीने एका कार्यक्रमात भारतीय मुलींबाबत केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता. “भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल”, असं सोनाली म्हणाली होती. सोनालीच्या या वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाने यावर भाष्य केलं आहे.
‘इन्स्टंट बॉलिवूड’शी बोलताना उर्वशीने सोनालीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “हे मला लागू होत नाही. मी मेहनती आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. मी स्वत:च्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये करिअर बनवलं आहे. मिस युनिव्हर्सचं परिक्षक पद भुषविणारी मी सगळ्यात तरुण मुलगी आहे. सोनालीचं बोलणं माझ्यासारख्या मुलींसाठी लागू होत नाही. मला कोणाचाही भावना दुखवायच्या नाहीत. पण ज्या मुली रिकामी बसल्या आहेत. त्यांच्यासाठी हे लागू होतं”.
हेही वाचा>> Video: जिनिलीयाने सगळ्यांसमोर रितेश देशमुखला “अहो” म्हणून मारली हाक, अभिनेता लाजला अन्…; व्हिडीओ व्हायरल
सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली?
“भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर आणि पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेन”, असं वक्तव्य सोनालीने केलं होतं.
“तुमच्या घरात अशी स्त्री निर्माण करा, जी स्वतःसाठी कमवू शकेल. जी घरात सामान घ्यायचं असेल तर पतीला अर्धे पैसे देऊ शकेल. मुलं १८ वर्षांची झाल्यावर त्यांना पैसे कमावण्याचा दबाव असतो. कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी येते. हे पाहून मला माझ्या या भावांसाठी रडायला येतं. माझा नवरा २०व्या वर्षी नोकरीला लागला आणि पैसे कमवू लागला. का? मुली तर २५-२७ वर्षांच्या होईपर्यंत फक्त विचारच करत असतात. तरी हनिमून भारतात नको परदेशात हवं, असा त्यांचा हट्ट असतो. आता तर विचारूच नका. डेस्टिनेशन वेडिंग्स, प्री-वेडिंग सगळं आलंय आणि त्याचा खर्चही त्या मुलाने करायचा असतो. का? तुम्हाला सर्व ऐशोआराम हवा असेल तर मग तुम्हीही कमवा. तुम्हीही शिका, नोकरी शोधा, चार ऑफिसमध्ये जा, कामासाठी विचारा, असं होत नाही,” असं सोनाली म्हणाली होती.