मध्यंतरी अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी शाहरुख खानच्या ‘DDLJ’मधला लोकप्रिय डायलॉग म्हणून दाखवला होता. यावरून आपल्याला अंदाज आला असेल की शाहरुख खानची लोकप्रियता किती दूर पसरली आहे. आता तर शाहरुखच्या या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. ‘पठाण’ने जगभरात केलेल्या कमाईवरून ते स्पष्टच झाले आहे. आता पुन्हा अशाच एका कारणामुळे शाहरुख खान चर्चेत आहे.
अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी नुकतीच भारतात येऊन ‘किंग खान’ शाहरुख खानची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. शाहरुखला भेटण्याआधी भारत दौऱ्यावर आलेल्या एरिक गार्सेट्टी यांनी रिलायन्सचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचीदेखील भेट घेतली. अमेरिकेचे राजदूत यांनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली.
आणखी वाचा : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून सोडवण्यासाठी जीवाचं रान करणारी, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आहे तरी कोण?
मुकेश अंबानी आणि शाहरुख खानबरोबरचे फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट केली आहे. अंबानी यांच्या कंपनीच्या बऱ्याच गोष्टींबाबत त्यांनी माहिती घेतली, शिवाय शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये त्यांचे उत्तम आदरातिथ्य करण्यात आले. शाहरुखबरोबरचा फोटो शेअर करत एरिक यांनी लिहिले, “हे माझे बॉलीवूडमधील पदार्पण तर नाही?” शाहरुखशीही त्यांनी चित्रपटसृष्टीबद्दल आणि बॉलीवूड, हॉलीवूड कल्चरबद्दल चर्चा केली.
गौरी आणि शाहरुख खानने त्यांची मॅनेजर पूजा ददलानीसह एरिक गार्सेट्टी यांचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांचे गप्पा मारतानाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी लिहिले, “असा ग्लोबल स्टार पुन्हा होणार नाही.” शाहरुख खान ‘पठाण’नंतर आता ‘जवान’मधून ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.