अभिनेत्री राखी सावंत गेले काही महिने तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चांगलीच चर्चेत राहिली. राखीने आदिल खानशी गेल्यावर्षी लग्न केलं होतं, पण लग्नाची बातमी तिने आठ महिने लपवून ठेवली होती. लग्नाची बातमी समोर आल्यावर तिच्या आणि आदिलमधील वादही समोर आले. पतीने फसवणूक केल्याची आणि मारहाण केल्याची तक्रार राखीने पोलिसांत दिली आणि आदिल खानला अटक झाली. राखी शिवाय एका इराणी तरुणीनेही आदिल खानवर बलात्काराचा आरोप केला आहे.
आदिल खानशी लग्न करण्यासाठी राखीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव फातिमा ठेवून घेतलं. पती तुरुंगात असताना आपण रोजे ठेवणार असल्याचं राखी म्हणाली आहे. तसेच रोज ती नमाज पठणही करते. राखीने नमाज पठण करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ती बुरखा घालून दिसत आहे. राखीने नखांना नेलपेंट लावल्याचंही या व्हिडीओत दिसतंय. यावरूनच काहींनी तिला ट्रोल केलंय.
‘नेलपेंट काढ आणि नमाज पठण कर’ अशी कमेंट एका युजरने राखीच्या या व्हिडीओवर केली होती. त्या कमेंटला राखीने उत्तर दिलंय. मग मी नमाज पठण करणं सोडून देऊ का. तुम्ही लोक वर जाऊन अल्लाहला उत्तर देणार का, मला घाबरवू नका, मी इस्लाममध्ये नवीन आहे आणि सगळं शिकण्याचा प्रयत्न करतेय, तुम्ही तुमचं बघा, असं उत्तर राखीने दिलं आहे.
राखीने आणखी एका युजरला उत्तर दिलंय. ‘इस्लाममध्ये नेलपेंट लावून कोण नमाज पठण करतं?’ अशी कमेंट एका युजरने केली होती. त्यावर “मला घाबरवू नकोस, मी इस्लाम धर्मात नवीन आहे, त्यामुळे असं म्हणून नको. मी बॉलिवूड अभिनेत्री आहे. मला तुम्ही सगळे सपोर्ट करा, खाली खेचू नका,” असं राखी म्हणाली.
दरम्यान, “हे पाहणं खरंच त्रासदायक आहे. तू हे करू शकत नाही, तू नेल एक्स्टेंशन लावले आहेस, तू हे सगळं फक्त कंटेंटसाठी करत आहे. तू एका धर्माची थट्टा करतेय, असं करू नकोस” अशा प्रकारच्या कमेंट्स राखीच्या या व्हिडीओवर आहेत.