मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी पुष्कर नाथ पंडित हे महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. नुकताच त्यांचा ‘ऊंचाई’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि डॅनी डॅन्झोपा असे मात्तबर कलाकार आहेत. नुकतीच त्यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
अनुपम खेर आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसून येतात. राजकीय सामाजिक मुद्द्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. एका विशिष्ट राजकीय भूमिकेचा कलाकारावर परिणाम होतो का याबद्दल अनुपम खेर म्हणाले, “मला वाटतं मतदान करणाऱ्या प्रत्येक माणसाची एक विचारधारा असते. त्यामुळे माझी कुठलीही विचारधारा नाही यावर माझा विश्वास नाही. बाहेर असलेला माझ्या ड्रायव्हरचीदेखील एक विचारधारा आहे. आता आपल्याकडे गुप्त मतदान आहे त्यामुळे ही एक वेगळी बाब आहे. माझी विचारधारा सर्वांना माहीत आहे कारण माझी विचारधारा भारताविषयी आहे, कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल नाही. त्यामुळे अडचण काय? जेव्हा मी भारताबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटते की मी राजकीय पक्षाबद्दल बोलत आहे. देशाबद्दल कोणीही बोलू शकतो, कारण मी या देशाचा आहे. या देशाने मला ओळख दिली आहे.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गेली कित्येक वर्षं अनुपम हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजश्री प्रोडक्शनच्या ‘सारांश’ या चित्रपटातून अनुपम खेर यांना ओळख मिळाली. त्यांच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. अनुपम खेर मूळचे हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी एनएसडी मधून नाट्यशास्त्रात पदवी संपादन केली आहे.
दरम्यान अनुपम खेर यांचा ‘उंचाई’ चित्रपट ६० वर्षं पार केलेल्या ४ मित्रांच्या भोवती लिहिली गेली आहे. या ४ पैकी एका मित्राचं निधन होतं, आणि केवळ त्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी उरलेले तिघे मित्र हे माऊंट एव्हरेस्ट शिखर चढायचं ठरवतात. या चित्रपटाचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे तसेच प्रेक्षकांचादेखील या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.