सिनेसृष्टीत ‘वंडर गर्ल’ म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर( Varsha Usgaonkar) होय. ‘साथी’, ‘हत्या : द मर्डर’, ‘अफलातून’, ‘परदेसी’, ‘घरजमाई’, ‘घर आया मेरा परदेसी’, ‘तिरंगा’, ‘हमाल दे धमाल’, ‘हनिमून’, ‘खट्याळ सासू नाटाळ सून’, ‘शेजारी शेजारी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठीसह बॉलीवूड चित्रपटांतून त्यांनी चित्रपटसृष्टीत त्यांच्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. अक्षय कुमार, ऋषी कपूर(Rishi Kapoor), मिथुन चक्रवर्ती अशा दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
वर्षा उसगांवकरांनी काही दिवसांपूर्वी ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ला मुलाखत दिली. ‘हनिमून’ चित्रपटात ऋषी कपूर, अश्विनी भावे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव किंवा किस्से आहेत का, जे शेअर करावेसे वाटतात, असे त्यांना विचारले गेले. त्यावर बोलताना वर्षा उसगांवकर यांनी म्हटले, “मी ऋषी कपूर यांचं नुकतंच ‘खुल्लम खुल्ला’ आत्मचरित्र वाचलं. ते मला फार आवडलं. कारण- ते आत्मचरित्र परीकथेसारखं आहे. राज कपूरचा मुलगा, त्या काळातलं ते वातावरण यामुळे ते तसं वाटतं. मला नेहमी ऋषी कपूर फार खडूस वाटले. जेव्हा हनिमून हा चित्रपट त्यांच्याबरोबर करत होते, त्यावेळी वाटायचं ते स्वत:ला मी राज कपूरचा मुलगा आहे, मी ऋषी कपूर आहे, सुपरस्टार आहे, मी कपूर घराण्याचा आहे, असं समजतात. तसं मला जाणवायचं. सेटवर आल्यावर ते बोलायचे तेव्हा जास्त हसायचेच नाहीत. मला असं वाटायचं की, हे तोंडभरून हसत का नाहीयेत. त्या मानानं अश्विनीबरोबर त्यांची फार गट्टी होती. कारण- हीना चित्रपट त्यांनी साइन केला होता. मला थोडी असूया वाटायचीच. मला असं वाटायचं की, अश्विनीशी हे एवढं छान बोलताहेत, माझ्याशी बोलत नाहीयेत. मग मी वेगळीच बसायचे. माझा स्वभावच नाही तसा. समोरून कोणी माझ्याशी जास्त बोललं नाही तर मी फार वाट्याला जात नाही. मग तो कोणी का असेना.”
पुढे वर्षा उसगांवकर म्हणतात, “मी ‘खुल्लम खुल्ला’ वाचलं. त्यात त्यांनी एकेक आपल्याबद्दल लिहिलंय. ते फार संवेदनशील होते. माणूस म्हणून ऋषी कपूर कसा होता, ते त्यांच्या आत्मचरित्रातून कळलं. मला असं वाटलं की, ते फार संवेदनशील होते. चांगले आर्टिस्ट तर होतेच; पण एक चांगला माणूससुद्धा होते. ‘खुल्लम खुल्ला’मध्ये त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केलेला आहे. काय गरज होती त्यांना? कारण- माझ्याबरोबर त्यांनी एकच चित्रपट केलेला आहे. तो हनिमून नावाचा. माझं नाव आहे त्यामध्ये. वर्षा उसगांवकर ही ‘हनिमून’मध्ये माझी नायिका होती. त्यामुळे मला छान वाटलं. मला असं वाटलं की, कदर केली त्यांनी माझी. आज ते हयात नाहीत. ते खडूस होते, हा माझा गैरसमज होता.”
हेही वाचा: ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आणि शिवानी सोनार लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर
दरम्यान, वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळालं होतं.