Varun Dhawan Calls Amit Shah Hanuman Of India : बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर संवाद साधला. वरुण नवी दिल्लीतील एका परिषदेत सहभागी झाला होता. कार्यक्रमात आपले भाषण संपवून वरुण प्रेक्षकांमध्ये बसला असताना गृहमंत्री अमित शहा मंचावर आले. वरुणने प्रेक्षकांमध्ये बसून अमित शहा यांचे कौतुक करत त्यांना एक खास प्रश्न विचारला.
वरुण ‘अजेंडा आजतक’ परिषदेत म्हणाला, “लोक त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणतात, पण मला त्यांना आपल्या देशाचे हनुमान म्हणावेसे वाटते, जे निःस्वार्थपणे देशसेवा करतात.” वरुणने अमित शाह यांना रामायणावर आधारित एक प्रश्न विचारला. वरूण म्हणाला, “भगवान श्रीराम आणि रावण यांच्यातील सर्वात मोठा फरक काय होता?”
वरुण धवनच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, “काही लोकांसाठी त्यांच्या कर्तव्यानुसार (धर्मानुसार) त्यांचे हित काय असावे हे ठरते, धर्मानुसार (कर्तव्यानुसार) एखाद्या गोष्टीचे पालन करावे का नाही, हे ते ठरवतात. तर काही लोक स्वार्थानुसार आपल्या कर्तव्याचे (धर्माचे) स्वरूप काय असावे हे ठरवतात. हाच राम आणि रावणामधील मुख्य फरक आहे.” असे अमित शाह यांनी नमूद केले.
गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले, “राम यांनी आपले जीवन धर्मावर आधारित ठेवले, तर रावणाने धर्माला आपल्या विचारांनुसार बदलण्याचा प्रयत्न केला.” याच कार्यक्रमात वरुण धवनने नंतर अहंकाराचा विषय मांडला, याच विषयाचा अमित शहा यांनी परिषदेत उल्लेख केला होता. वरुण म्हणाला, “तुम्ही अहंकाराचा उल्लेख केला. रावणाला आपल्या ज्ञानाचा अहंकार होता, तर रामांना अहंकाराबद्दल ज्ञान होते,” त्यावर शहा उत्तरले, “हे देखील धर्माच्या व्याख्येत मोडते.” गृहमंत्री अमित शाह आणि अभिनेता वरुण धवन यांच्यातील हा संवाद सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा…ना ‘मिर्झापूर’ ना ‘पंचायत’…; जगभरातील लोकांनी Google वर ‘या’ भारतीय वेब सीरिजला सर्वाधिक केलं सर्च
दरम्यान, कामाच्या आघाडीवर वरुण धवन लवकरच ‘बेबी जॉन’ या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा तमिळ चित्रपट ‘थेरि’च्या हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुणबरोबर कीर्ती सुरेश आणि वामीका गब्बी दिसणार आहेत. ‘बेबी जॉन’चे दिग्दर्शन कलीस यांनी केले असून ‘जवान’ फेम अॅटली यांनी हा चित्रपट सादर (प्रस्तुत) केला आहे.