अभिनेता वरुण धवन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करताना अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीद हिला उचलून तिला गालावर किस केल्यामुळे तो सध्या ट्रोल होत आहे. तर आता याबाबत वरुणने स्पष्टीकरण देऊन त्याची बाजू मांडली आहे.
नुकताच या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीदही या कार्यक्रमाला उपस्थित होती. तर या कार्यक्रमात वरुणने एक डान्स परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्सदरम्यान त्याने गिगीला हाताला धरून स्टेजवर आणलं. ती स्टेजवर येताच त्याने तिला उचलून घेतलं आणि गोल फिरवलं. इतकंच नाही तर त्याने तिला गालावर किसही केलं.
वरुणचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आणि त्याने तिची परवानगी न घेताच तिला किस केलं हे नेटकऱ्यांना खटकलं आणि त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. “हे सगळं करण्याच्या आधी तू तिची परवानगी घेतली होतीस?”, “तू सेलिब्रिटी असशील पण ती तिथे पाहुणी म्हणून आली होती. परवानगी घेणं हे आवश्यक होतं.”, “म्हणून भारतात कोणीही सेलिब्रिटी येण्यास इच्छुक नसतात,” असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
आता आज अखेर वरुणने एक ट्वीट करत त्याची बाजू मांडली. वरुणने आज एक ट्वीट करत लोकांच्या मनातील गैरसमज दूर केला आणि ती स्टेजवर येणं हे आधीच ठरलं होतं असा खुलासा त्याने केला. आता त्याचं हे ट्वीट खूप व्हायरल होत असून आता त्याच्या अनेक चाहत्यांनी वरुणची बाजू घेत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.