अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. मागच्या काही दिवसांपासून तो वेबसीरिज सिटाडेलमुळे चर्चेत आहे. ज्यात तो अभिनेत्री समांथा रुथ प्रभूबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. वरुण धवन त्याच्या कामाव्यतिरिक्तही सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर आपली मतं बिधनास्तपणे मांडताना दिसतो. नुकताच तो एका कार्यक्रमात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला मिळत असलेल्या यशाबद्दल बोलताना दिसला. एवढंच नाही तर त्याने बॉयकॉट ट्रेंडबद्दलही मोठं व्यक्तव्य केलं आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी झी सिने अवॉर्ड्स २०२३ च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकत्र हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर दिली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये वरुण धवनला शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी झालेल्या विरोधाबद्दल आणि बॉयकॉट ट्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर वरुणने खूपच चांगलं उत्तर दिलं.
आणखी वाचा- ‘पठाण’ची वाहवा होत असली तरी वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये ‘हा’ भारतीय चित्रपट आहे पहिल्या स्थानावर
वरुण म्हणाला, “आपण कोणत्याही प्रकारच्या बॉयकॉट ट्रेंडवर लक्ष न दिलेलंच उत्तम. ‘पठाण’ला मिळत असलेलं यश हेच सिद्ध करतं की प्रेक्षकांना ज्या प्रकारचं मनोरंजन अपेक्षित आहे ते त्यांना मिळायला हवं. आपण असं म्हणू शकतो की प्रेक्षकांना फक्त फ्रेश मनोरंजनची गरज आहे. जे त्यांना ‘पठाण’मधून मिळत आहे. प्रेक्षकांची ‘पठाण’ला पसंती मिळत आहे तर हा आनंदाचा क्षण आहे. मग आपण बॉयकॉट बॉलिवूडला एवढं महत्त्व का द्यावं? आपण तर यावर जास्त चर्चाही करायला नको.”
आणखी वाचा- लग्नाबद्दल बोलत होता रितेश देशमुख; मागून बायको आली अन्…, पाहा नेमकं काय घडलं
दरम्यान ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्याच्या ‘बेशरम रंग’ या गाण्याला प्रचंड विरोध करण्यात आला होता. सोशल मीडियावर या गाण्याच्या विरोधात बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला होता. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र बॉक्स ऑफिसवर त्याची यशस्वी घोडदौड सुरूच आहेत. पहिल्याच दिवशी ‘पठाण’ने ५७ कोटींचा गल्ला जमवला होता. तर मंगळवार पर्यंत या चित्रपटाने ३२८.२५ कोटी एवढी कमाई केली होती. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळताना दिसत आहे.