गोविंदा(Govinda)ने एकापेक्षा एक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ९० च्या दशकात त्यांची लोकप्रियता इतकी होती की गोविंदा एकाचवेळी अनेक चित्रपटांत काम करत असे. मात्र, गोविंदा यांच्या अभिनयाची जितकी चर्चा होत असे, तितकीच चर्चा त्यांच्या आळशीपणाची होत असे. सेटवर उशिरा पोहोचण्यासाठी गोविंदाची ओळख निर्माण झाली होती. ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाचे निर्माते निखिल अडवणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
“त्याला सर्वांना चुकीचे सिद्ध करायचे होते”
निखिल अडवाणी यांनी नुकतीच माशाबल इंडिया(Mashable India) मुलाखत दिली. यावेळी गोविंदा यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले, “माझ्यासाठी इरफान खान, अक्षय खन्ना व गोविंदा यांच्याबरोबर काम करणे, सर्वात आनंददायी होते. गोविंदा मला विचारत असे की, तुम्हाला हा सीन कसा हवा आहे? इटालियन, इंडियन, चायनिज की मुघलाई? तो अनेक कल्पना माझ्यासमोर मांडत असे. तो त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात होता. तो ‘पार्टनर’ व सलाम-ए-इश्क या दोन्ही चित्रपटांसाठी एकाचवेळी शूटिंग करत होता. त्याची वर्तणूक खूप चांगली होती. त्याला सर्वांना चुकीचे सिद्ध करायचे होते.”
वाशू भगनानी यांनी याआधी एका मुलाखतीत बोलताना गोविंदाबद्दल सांगितले होते. ‘हिरो नंबर १’ चित्रपटाच्या शूटिंगची आठवण सांगत वाशू भगनानी यांनी म्हटलेले, “७५ लोकांचे युनिट स्वित्झर्लंडमध्ये ३ दिवस शूटिंगसाठी गोविंदाची वाट पाहत होते. तीन दिवसांनंतर गोविंदा आला आणि त्याने जवळजवळ एका दिवसात त्याचे सर्व काम संपवले.”
गोविंदा यांचे अनेक सहकलाकारदेखील त्यांच्या उशिरा येण्याबद्दल अनेकदा व्यक्त होताना दिसतात. अभिनेते शक्ती कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत गोविंदा यांनी इतक्या वर्षात त्यांच्यात काय बदल केले, यावर वक्तव्य केले होते. शक्ती कपूर यांनी म्हटले होते की, गोविंदाने इतक्या वर्षात त्यांच्यामध्ये वक्तशीरपणा आणला आहे. गोविंदा सकाळच्या ९ च्या शिफ्टला संध्याकाळी ९ वाजता येत असे. आता मात्र ते सकाळी ९ च्या शिफ्टला साडे आठला येतो. त्याने त्याच्या वक्तशीरपणा आणला आहे.”
दरम्यान, गोविंदाने नुकतीच द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल वक्तव्य केले आहे. या चित्रपटातून गोविंदा पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याचे म्हटले जात आहे. याआधी गोविंदा यांनी ‘पार्टनर’ व ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटातून पुनरागमन केले होते. ‘पार्टनर’ला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले तर ‘सलाम-ए-इश्क’ हा चित्रपट मात्र अपयशी ठरला. आता गोविंदा कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.