गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’ (Kuttey) चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना ‘कुत्ते’बाबत उत्सुकता होती. मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच घडताना दिसत आहे. अर्जूनचा हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ
विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अर्जूनसह तब्बू, संतोष जुवेकर, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदन आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र तगडी स्टारकास्ट असूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असल्याचं चित्र दिसत आहे. तुलनेत रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.
‘कुत्ते’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी फक्त १ कोटी ४० लाख रुपये इतपत कमाई केली आहे. अपेक्षेपेक्षा ही कमाई खूपच कमी आहे. एकूण ८० कोटी रुपयांचा बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचू शकला नाही. शिवाय बऱ्याच महिन्यांनतर अर्जूनही रुपेरी पडद्यावर परतला. मात्र त्याचीही जादू फिकी पडली.
तर प्रदर्शनाच्या दोन आठवड्यानंतरही ‘वेड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला कायम आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. कमाईच्याबाबत अर्जूनच्या चित्रपटालाही ‘वेड’ने मागे टाकलं आहे.