प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापूर येथे स्टँडअप कॉमेडीचा शो संपल्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ११ ते १२ जणांच्या जमावाने मिळून त्याच्यावर हल्ला केला असा दावा प्रणितने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला आहे. अभिनेता वीर पहारियावर विनोद केला म्हणून त्याला ही मारहाण करण्यात आली असं जमावापैकी एकाने सांगितलं असंही प्रणितच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

या प्रकरणावर आता वीर पहारियाने स्वत: पोस्ट शेअर करत “या घटनेशी काहीही संबंध नसून, या हल्लाचा मी तीव्र निषेध करतो” असं म्हटलं आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

प्रसिद्ध मराठी कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण

२ फेब्रुवारीला संध्याकाळी सोलापूरात ही घटना घडली. ‘विनोदासाठी केली मारहाण’ असं कॅप्शन देत प्रणितच्या टीमने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत या घटनेची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. शो संपल्यावर ११ ते १२ जणांनी प्रणितवर हल्ला केला. जमावातील एकाने, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा” अशी धमकीही दिली आहे. याशिवाय त्याच्याबद्दल पुन्हा वक्तव्य केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही प्रणितला देण्यात आला आहे. यावर आता वीर पहारियाने स्पष्टीकरण दिलं आहे.

वीर पहारियाची पोस्ट

“कॉमेडियन प्रणित मोरेबरोबर जे काही घडलं, ते वाचून मला खरंच धक्का बसला आहे. सर्वात आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायचीये ती म्हणजे, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो. ट्रोलिंगला मी कधीच मनावर घेत नाही. उलटं मी हसतो आणि माझ्या टीकाकारांशी सुद्धा नेहमीच प्रेमाने वागतो. कधीही कोणाचं वैयक्तिक नुकसान करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही किंवा याचं समर्थन देखील करणार नाही. माझ्यासारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या सहकलाकारावर झालेल्या हल्ल्याचं तर मी अजिबातच समर्थन करणार नाही. प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी एकच सांगेन, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. तरीही याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण, कोणतीही व्यक्ती हे डिझर्व्ह करत नाही. या हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वत: लक्ष घालेन. पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो.” वीर पहारियाने पुढे या पोस्टमध्ये प्रणितला टॅग देखील केलं आहे.

veer pahariya
वीर पहारियाची पोस्ट

दरम्यान, वीर पहारियाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने ‘स्काय फोर्स’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. वीर हा स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याच्या पहिल्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं.

Story img Loader