वरूण धवनचा २०२२ मध्ये आलेला ‘भेडिया’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. हा चित्रपट ‘स्त्री,’ ‘स्त्री २’ या चित्रपटांप्रमाणे ‘मॅडोक सुपरनॅचरल युनिव्हर्स’चा एक भाग असून यात जबरदस्त अॅक्शन सुद्धा होती. या चित्रपटात बॉलीवूडमध्ये ‘स्काय फोर्स’ चित्रपटातून पदार्पण करणार असलेल्या ‘या’ अभिनेत्याने वरुण धवनच्या बॉडी डबलचे काम केले होते.
या नवोदित अभिनेत्याचे नाव आहे वीर पहारिया. वीर पहारिया हा जान्हवी कपूरच्या प्रियकराचा भाऊ आहेत. वीरने थिएटर, संगीत आणि नृत्य याचा अभ्यास केला आणि त्याने अमर कौशिक यांच्या ‘भेडिया’ चित्रपटातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून आपला प्रवास सुरू केला, एवढंच नाही तर त्याने ‘भेडिया’ सिनेमात काही दृश्यांमध्ये वरुण धवनच्या बॉडी डबलची भूमिकाही साकारली होती. लवकरच तो अक्षय कुमारच्या ऍरियल अॅक्शन फिल्म ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
२०२२ मध्ये वीरने आपल्या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त करताना सोशल मीडियावर काही बिहाइंड-द-सीन्स फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये वरुण धवनच्या काही दृश्यांचे शूट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ होते. या फोटोंमध्ये वरुण धवन, त्याची पत्नी नताशा दलाल, अभिषेक बॅनर्जी आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यासह टीमचे इतर सदस्य दिसत आहेत. त्या पोस्टला वीरने , “माझ्या पाचव्या चित्रपटातील – भेडियामधील असिस्टंट डायरेक्टर आणि बॉडी डबलचा अविस्मरणीय अनुभव.” असे कॅप्शन दिले होते.
पाहा फोटो –
पाहा फोटोज –
‘स्काय फोर्स’ हा आगामी ऍरियल अॅक्शन चित्रपट वर्षातील सर्वाधिक बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. संदीप केवळानी आणि अभिषेक कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात वीर पहारिया आणि अक्षय कुमार व्यतिरिक्त सारा अली खान आणि निम्रत कौर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.