१९९३ सालच्या ‘परंपरा’ या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते मुकेश ऋषी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सहाय्यक भूमिकांबरोबरच खलनायक म्हणूनही त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. इतकंच नव्हे तर धर्मेद्र, अमिताभ बच्चन यांच्यापासून आमिर खानपर्यंतच्या सुपरस्टार्सबरोबर मुकेश यांनी वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे. इतकी वर्षं काम करूनही मुकेश यांचे बॉलिवूडमधील लोकांनी फारसे मैत्रीपूर्ण संबंध किंवा सख्य नाही.
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान मुकेश यांनी याबद्दल खुलासा केला. आज ते एक प्रसिद्ध अभिनेते जरी असले तरी अत्यंत सामान्य माणसासारखे जीवन जगतात. ‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुकेश म्हणाले, “मी कोणत्याही कंपूचा भाग नाही. मी आजवर ज्या चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, अन् मी त्यांच्याकडून कधीच अवास्तव अशा अपेक्षाही ठेवल्या नाहीत.”
आणखी वाचा : सलमान खानच्या ‘टायगर ३’ची कथा झाली लीक; ‘या’ मिशनसाठी टायगर व झोया असतील सज्ज
चित्रपटसृष्टीत फारसे मित्र नसण्याबद्दल मुकेश ऋषि म्हणाले, “मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्याबरोबर घट्ट मैत्री व्हावी इथपर्यंत कधीच गोष्टी गेल्या नाहीत. प्रत्येक व्यक्तीची काम करायची पद्धत असते. शूटिंग झाल्यावर माझ्या डोक्यात पहिला विचार घरी जायचा अन् जीममध्ये जायचा असायचा. काही लोक तिथेच थांबून मद्यपान करायचे. त्यामुळे त्यांची मैत्री व्हायची. सुरुवातीपासूनच काय करायचं आहे ते मला ठाऊक होतं.”
पुढे मुकेश ऋषि म्हणाले, “सन्मान देणं फार महत्त्वाचं आहे. बरेच कलाकार माझ्यापेक्षा लहान आहेत, पण त्यांना मिळालेलं यश पाहून मी त्यांचा आदर करतो. आजही आमिर खान मला कुठेही भेटला तरी तोदेखील माझ्याशी आदराने बोलतो.” ६७ वर्षांच्या मुकेश ऋषि यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे. ‘सरफरोश’, ‘गर्व’ ‘गुंडा’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होतं.